पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा धनुष्णबाणाकडेच राहील व विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणा नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. त्यानंतर भाजपमधून या घोषणेला विरोध झाला. त्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी श्रीकांत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे खडेबोलच सुनावले आहेत.
भुजबळ म्हणाले, भाजपकडून विरोध होणे स्वाभाविक आहे. श्रीकांत शिंदेना अशाप्रकारे उमेदवारी घोषित करण्याचा अधिकारच नाही. युतीमध्ये सगळ्यांनी थोडीशी शिस्त पाळली पाहिजे अशा शब्दात भुजबळांनी श्रीकांत शिंदेना सुनावलं आहे.
दरम्यान श्रीकांत शिंदेच्या या घोषणेनंतर गिरीश महाजन यांनीही तत्काळ नाशिक गाठलं होतं. महायुतीत विद्यमान खासदार असलेल्या जागी तोच पक्ष निवडणूक लढेल, असा फार्म्युला ठरला आहे. पण त्याचवेळी काही ठिकाणी उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे सांगत नाशिकचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेच घेतील, असे महाजन म्हणाले. त्यामुळे नाशिकच्या जागेवरुन सस्पेन्स वाढला आहे.
The post 'थोडी शिस्त पाळली पाहिजे' मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं appeared first on पुढारी.