दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, माकपाचे जे. पी. गावित आज भरणार अर्ज

जे. पी. गावित, भास्कर भगरे

नाशिक / दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे शुक्रवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. माकपाच्या एन्ट्रीमुळे मविआचा मार्ग खडतर बनला आहे.

लोकसभा निवडणूकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा कायम असताना दिंडोरी मतदार संघात नव्याने राजकीय घडामोड पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या माकपाने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. माकपाच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची गुरुवारी (दि.२५) आॅनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरीतून माजी आमदार गावित यांना निवडणूकीच्या रिंगण्यात ऊतरविण्याचा अंतिम निर्णंय घेण्यात आला. या नविन नाट्यमय घडामोडीमुळे मविआच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

महाविकास आघाडीत पहिल्या दिवसापासून माकपाने मित्रपक्षच्या ऊमेदवाराला मदत करण्याची भुमिका घेतली होती. परंतु, गेल्या आठवड्यात गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तेथेच महाआघाडीच्या फुटीची पहिली ठिणगी पडली. दिंडाेरीत डॅमेज कंट्राेल रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट दिंडोरी गाठत गावितांशी चर्चादेखील केली. त्यावेळी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव पाटील यांनी गावितां समोर ठेवला. पण आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत नाही, असे सांगत गावितांनी पवार गटाचा प्रस्ताव धुडकावुन लावला. दरम्यान, गावित माकपाकडून शुक्रवारी (दि.२६) पहिल्या दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. माकपाच्या निवडणूकीतील एन्ट्रीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. परिणामी दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकपा व वंचित अशी चौरंगी लढत रंगणार आहे.

माकपाच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची बैठक आज आॅनलाईन पद्धतीने पार पडली. बैठकीत माझ्या उमेदवारी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म घेऊन पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे शुक्रवारी (दि.२६) नाशिकमध्ये येत आहे. त्यानंतर दुपारी आम्ही अर्ज दाखल करु.

-जे. पी. गावित, माजी आमदार, माकपा.

राज्यात मविआचे गणित ठरणार

दिंडोरी लोकसभा निवडणूकीत माकपाने ऊमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद आता राज्यभरात ऊमटण्याची चिन्हे आहेत. दिंडोरींच्या जागेवरून राज्यातील माकपाचे मतदार कोणती भुमिका घेता हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. माकपा मतदारांच्या भुमिकेवर राज्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे सारे गणित अवलंबून आहे.

हेही वाचा –