द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक

द्राक्ष शेती

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना अहमदाबाद, गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १७ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी शंकर बाळकृष्ण बैरागी वय ५२ वर्ष रा. शिंदवड यांचा परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांनी ६ लाख १ हजार रूपयांचा माल खरेदी करून पैसे देण्यास नकार दिला. त्याविरोधात लोकेंद्र सिंह दिवान सिंह, सुनील सिंह अनिल सिंह रा.फत्तेपूर सिक्री, हसनपुरा आग्रा हल्ली मुक्काम- खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा-नाशिक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकेंद्र सिंह दिवान सिंह यांनी बैरागी यांच्या द्राक्षबागेचा २५ रुपये प्रति किलो प्रमाणे व्यवहार केला.  दि. ०८ फेब्रुवारी ते दि. २१ फेब्रुवारी दरम्यान शंकर बैरागी यांच्या बागेतील २५१०० किलो द्राक्ष खरेदी करुन व्यवहारापोटी एकुण झालेल्या ६,२७,५००/-रुपये पैकी २६,००० रुपये रोख दिले. उर्वरीत बाकी रक्कम ६,०१,५००/-रूपये शेतकऱ्याने वारंवार मागणी करुन दिले नाही. याबाबत वणी पोलिस ठाण्यात १६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने वणी पोलिसांचा तपास सुरू होता. वणी पोलिस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचना नुसार पथक तयार करण्यात आले होते. या पथकाचे प्रमुख विजयकुमार कोठावळे होते. वणी पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वणी पोलीसांनी तपास करीत अहमदाबाद गुजरात येथून दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना दि.१३ रोजी ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता दि.१७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास पथक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे, पोलीस अंमलदार विजय लोखंडे व कुणाल मराठे हे होते.

हेही वाचा –

The post द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक appeared first on पुढारी.