धार्मिक विधीसाठी घोरपडीचे लिंग विक्री करणाऱ्या तिघांना अटक

वनविभाग नाशिक pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
मनमाड रेल्वेस्टेशन परिसरात नर घोरपड या वन्यजीव प्राण्याची लिंग विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहीती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींना सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

अधिक माहीतीनुसार, विभागीय वन अधिकारी (दक्षता) विशाल माळी यांना वन्यजीव अपराधाची खबर मिळाली होती. राजेंद्र भोसले, रुपेश भोसले, रॉकी चौहाण हे तीन आरोपी मोटरसायकलवरुन मनमाड रेल्वे स्थानक परिसरात नर घोरपडीची लिंग विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती मिळाली होती. वणी दक्षता पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या निर्देशानुसार पवार यांनी वनपाल वैभव गायकवाड व वनरक्षक उस्मान सैय्यद, मुकुंद शिरसाठ यांच्यासह बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींचा सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले. त्यांच्याकडील नर घोरपडीची 119 लिंग, दोन मोटरसायकल, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलमानुसार वनगुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स्थानिक वनविभाग येवला करत आहे.

नर घोरपडीचे लिंग ही धार्मिक विधीमध्ये पुजेसाठी वापरण्याची अंधश्रध्दा समाजात पसरलेली असल्याने दुर्मिळ होत चाललेल्या अनुसूची एक मधील वन्यप्राण्यांची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा अंधश्रध्दांना बळी पडू नये व अशा घटना निदर्शनास येताच त्वरित वन विभागाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. – संजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षता पथक.

हेही वाचा:

The post धार्मिक विधीसाठी घोरपडीचे लिंग विक्री करणाऱ्या तिघांना अटक appeared first on पुढारी.