पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- पुणे मंचर येथुन एसटी बसने नाशकात येऊन अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून घरफोडी करणारा व त्याचा साथीदार अशा दोघा संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलीस तपास करत असतांना पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडी करणारा संशयीत आरोपी हा मंचर पुणे येथे वास्तव्यात आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान चव्हाण, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, अनिल कुराडे, जनार्दन ढाकणे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार यांच्या पथकाने थेट मंचर गाठत संशयित आरोपी भारत सखाराम खरात (मंचर पुणे) याला सीताफिने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीत मागील सहा महिन्यात त्याच्या साथीदारांसह सहा ठिकाणी बंद घर व कंपनीत बेकायदेशीर प्रवेश करून घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याचा एक साथीदार सोनू कांबळे (रा. घरकुल अंबड) याला देखील ताब्यात घेतले आहे. इतर संशयित फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रोज सध्याकाळी एसटीने पुण्याहुन यायचा…

संशयित खरात हा मंचर पुणे येथे राहणारा असून तो एसटी बसने सायंकाळी नाशकात येत होता. साथिदारांसमवेत नाशिमध्ये रात्री घरफोडी करून सकाळी पुन्हा एसटी बसने पुण्याला निघून जायचा. खरात पूर्वी नाशिकच्या गंगापूर रोडला राहत होता. त्यावेळी देखील त्याने दहा घरफोडी केल्या होत्या. त्याच्या समवेत असलेले फरार आरोपी यांची तो नाशकात राहत असताना जुनी ओळख होती.

हेही वाचा :

The post पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा appeared first on पुढारी.