नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल

शिरीष कोतवाल pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नाशिक व धुळे जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली. पक्षाकडूनही नाराजांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. तर नाराज पदाधिकारी लवकरच प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास कोतवाल यांनी वर्तवला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातून नाशिकचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे दोघेही इच्छुक होते. धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन व धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यात कसमा पट्टा हा निर्णायक ठरत असल्याचे गत निवडणुकांमधून समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने धुळे जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बच्छाव यांचे सासर व माहेर धुळे लोकसभा मतदारसंघातच येत असल्याने त्यांचे नातेसंबंध व ओळखीच्या जोरावर त्या बाजी मारू शकतील, या हेतूने पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, त्यामुळे डॉ. शेवाळे व सनेर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत नाराजी वर्तवली. त्यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. पक्षानेही त्यांचे राजीनामे मंजूर करत पक्ष मोठा, असा संदेशच दिला. पक्षाने तातडीने कोतवाल यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत प्रचारास सुरुवातही केली आहे. कोतवाल यांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी ते नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढणार असल्याचे समजते. नाराजी दोन दिवसांची असते. मात्र, डॉ. शेवाळे यांचे कुटुंबीय व ते पूर्वीपासून काँग्रेस पक्षाशी बांधिल असल्याने ते नाराजी दूर सारून प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास कोतवाल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाराज पदाधिकारी पुन्हा जोमाने पक्षकार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. मतदारसंघातील अनेक प्रश्न कायम असून शेतकरी, कामगार वर्गांमध्ये प्रचंड नाराजी आहे. युवावर्गातही बेराेजगारीचा प्रश्न कायम असल्याने प्रचारात या मुद्द्यांवर जोर देऊन विजय मिळवण्यासाठी प्रचार करणार असल्याचे कोतवाल यांनी सांगितले.

आजच्या बैठकीकडे लक्ष
मंगळवारी (दि.१६) काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील काँग्रेस भवन येथे नाशिक शहर व जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत नाराज पदाधिकारी सहभागी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

The post नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल appeared first on पुढारी.