नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका!

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्चच्या प्रारंभीच नाशिकवर सूर्यनारायण कोपले असताना, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पावसाळ्यापर्यंत पुरणार असल्याने जिल्हावासीयांची पाणी कपातीमधून सुटका झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानाच्या पारा ३६ अंशांवर गेल्याने यंदा तीव्र उन्हाळा असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये काहीशी चिंता आहे. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये ४० हजार ३८२ दलघफू (६१ टक्के) पाणीसाठा शिल्लक असून, जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज असल्याने सर्वसामान्यांची एक समस्या दूर झाली आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३,८९४ दलघफू म्हणजेच ६९ टक्के साठा आहे, तर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून एकूण साठा ६,८२७ दलघफू (६७ टक्के) आहे. दारणा धरणात ५,५७२ दलघफू (७८ टक्के) तसेच समूहातील सहाही प्रकल्प मिळून १४ हजार ७१ दलघफू पाणी असून त्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. पालखेड समूहातील तिन्ही प्रकल्पांमध्ये ४,४२६ दलघफू (५३ टक्के) साठा आहे. ओझरखेड समूहातील तीन प्रकल्पांत एकूण २,११८ दलघफू (६६ टक्के) पाणी उपलब्ध आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहातील चार प्रकल्पांमध्ये ११,५४२ दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण ५० टक्के आहे. तसेच पुनदच्या दोन्ही प्रकल्पांमध्ये १,२४४ दलघफू (७६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली, तरीही पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.

धरणसाठा (दलघफू)
गंगापूर : ३,८९४, दारणा : ५,५७२, काश्यपी : १,६९२, गौतमी गोदावरी : ७७८, आळंदी : ४६०, पालखेड : ३४२, करंजवण : ३,२४१, वाघाड : ८४३, ओझरखेड : १,४९५, पुणेगाव : ३७५, तिसगाव : २४८, भावली : १,०००, मुकणे : ५,७०२, वालदेवी : ९५९, कडवा : ५८१, नांदूरमध्यमेश्वर : २५७, भोजापूर : १५७, चणकापूर : १,५०७, हरणबारी : ७९७, केळझर : ३११, नागासाक्या : ९७, गिरणा : ८,८३०, पुनद : १,१०५, माणिकपुंज : १३९.

हेही वाचा:

The post नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका! appeared first on पुढारी.