
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. नाशिकसह पाच जागांच्या वाटपावरून महायुतीत निर्माण झालेल्या संघर्षावर सोमवारी (दि.१) रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात झालेल्या एकत्रित बैठकीनंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विशेष म्हणजे नाशिकची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना मिळावी की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत संघर्षाचे कारण ठरली आहे. जागा वाटपाचा वाद थेट दिल्लीच्या कोर्टात पोहोचला आहे. दिल्लीतूनच आपली उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे, तर उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार असल्याचा दावा करत गोडसे यांनी थेट प्रचारच सुरू केला आहे. निवडणूक लढविण्यावर गोडसे ठाम आहेत. उमेदवारी न मिळाल्यास ‘वंचित’सारख्या पर्यायाची चाचपणीही गोडसेंनी सुरू केल्याची चर्चा आहे. नाशिकच्या बदल्यात ठाण्याची जागा शिंदे गटाने पदरात पाडून घेतल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. रविवारी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात नाशिकच्या उमेदवारीविषयी अनेक खलबते झाली. नाशिकचा संभाव्य उमेदवार कोण असावा, याविषयी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मते नोंदविल्याचे समजते. नाशिकच्या उमेदवारी निश्चितीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या या अभिप्रायांची दखल घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा:
- Lok Sabha Election 2024 : विखेंच्या प्रतिष्ठेची तर लंकेंच्या अस्तित्वाची लढाई
- Lok Sabha Election 2024 : मतदारसंघ एक; मात्र दोघे लोकसभेवर
- loksabha elecation : बारामतीकरांपुढे उभे ‘हे’ धर्मसंकट..
The post नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.