नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून, तो पंचवटी परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न करीत होता. एका गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर तो पंचवटीत राहत होता. दरम्यान, परिसरासह आपल्यावर दहशत करण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याचे इतर मित्र संतापले होते. नीलेश हा संशयितांसोबत अनेकदा मद्यसेवन करून गुन्हे करीत होता. मात्र, नीलेश आपली चेष्टा करतो, याचा राग संशयितांना होता. त्यामुळे संशयितांनी नीलेशवर हल्ला करण्याचा कट रचला. संशयितांनी काही दिवसांपूर्वीच नीलेशवर त्याच्या घराजवळच हल्ला केला होता, मात्र तो त्यातून निसटला होता. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री एक वाजता नीलेश हा मित्र उमेश साबळेसाेबत फुलेनगरातील म्हाडा बिल्डिंगजवळ उभा असताना, संशयित तेथे आले. त्यांनी नीलेशवर धारदार शस्त्राने वार करून पळ काढला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पाेलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक विलास पडाेळकर, पीएसआय के. एस. जाधव आदी दाखल झाले. त्यांनी चौकशी करीत खून करणाऱ्यांचा शोध सुरू केला. त्यात सहापैकी चौघे अल्पवयीन असून, पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
- मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?
- Celebrity Holi : मराठी- बॉलिवूड सेलेब्रिटींनी केली रंगाची उधळण; होळीचे पहा फोटो-व्हिडिओज्
- Celebrity Holi : मराठी- बॉलिवूड सेलेब्रिटींनी केली रंगाची उधळण; होळीचे पहा फोटो-व्हिडिओज्
The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.