लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?

लासलगाव कांदा मार्केट,www.pudhari.news

राकेश बोरा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

१९४७ साली देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य चळवळीची जागा मग सहकार चळवळीने घेतली. त्या काळात लासलगांव परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने १९४७ साली लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. सुरुवातीला निफाड व चांदवड तालुका या समितीचे कार्यक्षेत्र होते. पुढे चांदवड तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाल्यामुळे निफाड तालुका एवढेच कार्यक्षेत्र आपले राहिले. तद्नंतर अगदी अलीकडे परत विभाजन होऊन लासलगांव व पिंपळगांव (ब.) अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्यामुळे सध्या लासलगांव-निफाड परिसर असे आपले कार्यक्षेत्र आहे.

स्व. खुशालशेठ ब्रह्मेचा, स्व. भिकुशेठ सांड व स्व. मोहनभाऊ डागा साडेसातच्या घंटेला मार्केटमध्ये हजर असत. खुशालशेठ साधारणतः लाल पगडी घालीत तर भिकुशेठ पिवळी पगडी आणि मोहनभाऊ काळी टोपी! या दोन पगड्या व काळी टोपी आल्याशिवाय मार्केट चालू होत नसे. परंतु स्वयंशिस्तीचे तिन्ही हेडमास्तर साडेसातला लिलाव पुकारण्यास सुरुवात करीत असत. सकाळच्या उल्हासित वातावरणात लिलाव सुरू होत असे. दुपारची अल्पशी विश्रांती झाली की सायंकाळी कितीही उशिर होवो, सर्व मालाचा लिलाव झाल्याशिवाय ही मंडळी घरोघर जात नसत. सर्व मालाची वजन-मापे, चुकवती त्याच दिवशी होत असे. मग भलेही पहाटेचे ३-४ वाजेनात. परत सुप्रभाती ‘दोन पगड्या’ व ‘काळी टोपी’ साडेसातच्या घंटेला मार्केटमध्ये हजर! अशा शिस्तीचे पालन करत लासलगाव बाजार समितीने देशात आपले अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे.

अन् लिलाव पध्दतीने होवू लागली विक्री

शेतीमालाच्या विक्रीसाठी लिलाव पध्दतीने सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेतमाल मार्केट यार्डावर आल्यामुळे व्यापारीवर्गात स्पर्धा निर्माण झाली. उघड लिलाव पध्दतीने विक्री होऊ लागली. त्यामुळे शेतीमालास स्पर्धात्मक किंमत म्हणजेच योग्य किंमत मिळू लागली. परिणामी मालाची प्रचंड आवक सुरू झाली. वाहतुकीच्या आणि विक्रीच्या सोयीसाठी विविध गावात उपबाजार सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा लाभला. वजनमाप चोख होऊ लागले आणि रोख पैसा मिळू लागला. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाला.

लासलगांव परिसर हा सुरुवातीपासून व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होता. रेल्वे स्टेशन, वाहतूक व्यवस्था, पोस्ट या सुविधांमुळे बाजारपेठ विकसित झाली. अनेक व्यापारी स्थिर होऊ लागले होते. सचोटी व आर्थिक स्वच्छ व्यवहार यामुळे व्यापार वाढला. असंघटित असा बाजारपेठेचा आकार लासलगांवला आलेला होता.

…परंपरा मोडीत काढीत, अमावस्येला सुरु केले लिलाव

लासलगांव हे तालुक्याचे ठिकाण नव्हते आणि नाही. खरे तर निफाड हे तालुक्याचे स्थळ! तरीही बाजार समितीची स्थापना झाली ती लासलगांवी. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकजीव साखळी निर्माण झालेली होती. एकाच धाग्यात शेतकरी-व्यापारी यांची वीण विणलेली होती. प्रमुख नेते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने बाजार समितीची स्थापना सहजगत्या होऊ शकली. स्थापनेपासून एका महिन्यानेच प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होऊ शकली यातच सर्व यश सामावले आहे. लासलगांव बाजार समितीच्या स्थापनेपासुन 75 वर्षाच्या कालखंडात लासलगांव बाजार समितीत अमावस्येला कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे. परंतू शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व परिसरातील शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगांव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत अमावस्येपासुन प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात कांदा या शेतीमालाचे लिलाव सुरू केले. याचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे.

निर्यातीतून वर्षाला ३ हजार कोटी रुपयांहुन अधिक परकीय चलन

कांद्याची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. देशभरातील कांदा दर हे लासलगाव बाजार समिती वरून ठरले जातात. कांद्या संदर्भात काहीही निर्णय झाला तर संपूर्ण देशाचे लक्ष लासलगावकडे लागलेले असते. आपल्या पारदर्शक कामाच्या जोरावर लासलगाव बाजार समितीतने चांगली कामगिरी करत १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली. अमावस्या आणि शनिवार असे वर्षातील ६० दिवस कामकाज वाढल्याने उलाढालीत विक्रमी वाढ झाली आहे. तर कांदा विक्रीतून बाजार समितीला १३०५ कोटी रुपयांचे उलाढाल झाली आहे. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकर्यांमध्ये आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून ३ हजार कोटी रुपयांहुन अधिक परकीय चलन मिळाले आहे.

17 एकर जागा, रोज 3 हजार शेतकरी

तब्बल 17 एकर जागेवर लासलगाव कांदा मार्केट विस्तारले आहे. याठिकाणी एकुण 50 कांदा व्यापारी सक्रीय असून साधारण 3 हजार शेतकरी दररोज बाजार समितीत येतात.

हेही वाचा :

The post लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट? appeared first on पुढारी.