नाशिकमध्ये अवतरले रामराज्य… शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी

रामराज्य pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सजविलेली घरे, घरांपुढील रांगोळी, मंगलवाद्यांचे सुर, घरावर उभारलेली गुढी, तसेच रामाची प्रतिमा असलेला भगवाध्वज सोबत आतषबाजी, दिव्यांची आरास, मुखी रामनामाचा जयघोष तसेच अंत:करणात साठवलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे राजस सुकुमार रूप अशा उत्साहात नाशिककरांनी अयोध्येतील प्रभू रामलल्लांचा प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला. यावेळी अवघी नाशिकनगरी ‘रामनामा’च्या भक्तीत दंग झाली. सोहळ्यानिमित्ताने शहरवासीयांनी दिवाळी साजरी केली.

५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात सोमवारी (दि. २२) प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह नाशिकमध्ये पाहायला मिळाला. शहर व परिसर भगव्या पताकांनी सजले होते. पहाटेपासूनच सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण होते. ठीक दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी अयोध्येत प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना झाली. यावेळी ‌’जय सीता राम सिता; सियावर रामचंद्र की जय’, ‘पवनसुत हनुमान की जय; अयोध्यावासी प्रभू रामलल्ला की जय’ असा जयघोष केला. सोबतच नाशिककरांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत हा क्षण साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अयोध्या सोहळ्याचे औचित्य साधत पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. याशिवाय शनिचौकातील गाेरेराम मंदिर, रविवार कारंजा परिसरातील गोरेराम मंदिरासह श्री कपालेश्वर तसेच शहर परिसरातील विविध मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अवघे वातावरण रामनामाच्या नामात दंग झाले. या आनंदपर्वात आबालवृद्धांसह महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.

महाप्रसादाचे वाटप

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने शहरभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी विविध धार्मिक संस्था तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांतर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये बुंदीचे लाडू, पंजिरी, बुंदी, मसाले भात, साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू यासह अन्य प्रसादाचा समावेश होता.

राम आयेंगे तो….

शहरातील गल्लोगल्ली प्रभू रामचंद्रांची प्रतिमा उभारण्यात आली. तसेच ध्वनिक्षेपकावर प्रभू राम यांची निरनिराळी गाणी वाजविण्यात येत होती. त्यामध्ये ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी; मेरी चाैकट पे आज चारो धाम आये हे” राम जी कि निकली सवारी, राम जी की लिला हे न्यारी’ ‘अब एक ही नाम गुंजेगा, भारत का बच्चा-बच्चा जय जय श्रीराम बोलेंगा’ यासह विविध गाण्यांना पसंती मिळाली.

इस्कॉन मंदिरात विशेष कार्यक्रम

व्दारका येथील इस्कॉन मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिरामधील राधा व श्रीकृष्ण यांच्या विग्रहांना आकर्षक शृंगार व सजावट केली गेली. तसेच महाआरती व भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण मंदिर परिसरात सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

सर्वधर्म मंदिरात ‘रामायण’ पाठ

तपोवनामधील कपिला संगम येथील सर्व धर्म मंदिरांत सकाळी ११ वाजता अखंड रामायण पाठाची सांगता करण्यात आली. यानिमित्ताने स्थापन करण्यात आलेली प्रभू रामांची लोभसवाणी मूर्ती, बाजूला भक्त हनुमानांच्या बलदंड मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. साध्वी हिराजी, साध्वी पंकजाजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानवधर्मप्रेमी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गोदाघाटावर ५० हजार दिवे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गोदाघाटावर ५० हजार दिव्यांच्या सहाय्याने राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. सायंकाळी रामकुंड ते नारोशंकर मंदिर असा दीपोत्सव साजरा केला गेला. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची गोदातीरी गर्दी झाली. तसेच श्री काळाराम मंदिर, व्दारका येथील इस्कॉन मंदिर, पेठ रोडवरील भक्तिधामसह शहरातील छोट्या-मोठ्या मंदिरांत सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाविकांनी साधारणत: दोन लाख दिवे प्रज्वलित केले. या नेत्रदीपक दीपोत्सवाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याशिवाय नाशिककरांनी घरोघरीदेखील सायंकाळी दिवे पेटवत अयोध्या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये अवतरले रामराज्य... शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी appeared first on पुढारी.