
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्ह्याचा तपास करताना मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकरोडच्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले. गणपत महादू काकड (५७, रा. गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरूळ) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे.
एका दाम्पत्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास काकड करीत आहेत. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दाम्पत्यास तपासात मदत करण्यापोटी काकड याने त्यांच्याकडे बुधवारी (दि.५) २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. तक्रारदाराने काकडसोबत लाचेची रक्कम देण्यासाठी तडजोड केली. गुरुवारी (दि.६) काकड १५ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी काकड विरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. विभागाने काकड यांच्या घराची झडती घेतली आहे. विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, नाईक ज्योती शार्दुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा :
- अतिउत्साही तरुणांच्या उत्तरांनी पोलिसही चक्रावले
- सोलापूर विमानसेवेचा लवकरच श्रीगणेशा
- पुणे : नाव गोपनीय ठेवण्याच्या नियमाला अतिक्रमण निरीक्षकाकडून मूठमाती
The post नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.