नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान

दुर्गंधीयुक्त पाणी www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

धम्मगिरीवरून : वाल्मीक गवांदे

शहरात नगर परिषदेकडून वर्षाचे बाराही महिने पिण्यासाठी आठवड्यातून केवळ तीन दिवसच पाणीपुरवठा केला जातो. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता गेल्या तीन आठवड्यांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या माहेरघरीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नगर परिषदेच्या तलावातील पाणी संपत आले असून, उरलेले खराब व गढूळयुक्त पाणी फिल्टर न करताच पुरविले जात आहे. त्यामुळे नळातून पाण्यात अक्षरश: अळ्या व किडे आढळत असून, हे दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक नागरिकांना पिण्यासाठी पाणीच मिळत नाही. शहरातील खालची पेठ परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. इमारतीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी मोटरचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या नागरिकांकडे मोटर नाही, अशा नागरिकांच्या नळाला पाणीच येत नसल्याने शहरातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा कर्मचार्‍यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने मनमानी होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नगर परिषदेच्या तलावात पाणी संपल्यावर तळेगाव येथील जीवन प्राधिकरणाच्या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच कोट्यवधी रुपये खर्चून भावली धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. यासाठी पाणी बिलातही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. भावली धरणापासून इगतपुरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, भावली धरणाचे पाणी न देता दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणारे अधिकारी मुख्यालयी न राहता रोज नाशिकहून ये-जा करीत असल्याने त्यांना इगतपुरीतील नागरिकांशी जणू काही देणे-घेणे नाही, अशा मनःस्थितीत वावरत आहेत. शहरात नागरी समस्या उद्भवत असून, अनेक भागांतील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त होऊन नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी येतात. मात्र वरिष्ठ अधिकारी कार्यालयात येत नसल्याने जाब कोणाला विचारायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासकीय अधिकारी फिरकतच नाहीत
मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आले आहेत. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी तेजस चव्हाण काम पाहात होते. चव्हाण हे आठवड्यातून किमान चार दिवस नगर परिषद कार्यालयात येऊन काम पाहात असल्याने नागरिकांना आपल्या अडचणी सोडविण्यास मदत मिळत होती. मात्र, तेजस चव्हाण यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर प्रांताधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. मात्र, प्रशासक म्हणून प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे हे इगतपुरी नगर परिषद कार्यालयात येत नसल्याने नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आता हंडा मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.

The post नाशिक : इगतपुरीकर दुर्गंधीयुक्त पाण्याने भागवतोय तहान appeared first on पुढारी.