नाशिक : कांदा उपाययोजना समिती लासलगावात

लासलगाव,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यात लाल कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी गठीत केलेली समिती आज लासलगाव बाजार समितीत डेरेदाखल झाली. समितीने व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.

समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार हे असून, विद्यमान पणन संचालक विनायक कोकरे, जिल्हा निबंधक सुनील खरे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी सदस्य आहेत. दुपारी साडेतीनला बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करत वस्तुस्थिती जाणून घेतली.

कांदादर घसरणीला कारणीभूत परिस्थिती, एक डिसेंबर 22 ते 28 फेब्रुवारी २०23 या दरम्यान झालेली कांद्याची आवक व दर, देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य व त्या राज्यातील एक डिसेंबर 22 ते 28 फेब्रुवारी 23 या कालावधीतील आवक व दर याचा महाराष्ट्रातील कांदा भावावर झालेला परिणाम याची माहिती समितीने घेतली. कांदा भाव घसरणीसंदर्भात शेतकरी व शेतकरी संघटना यांच्या तक्रारींवर उपाययोजना, देशांतर्गत कांदा वाहतूक अनुदान योजना, कांदा निर्यातीसाठी विविध उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीत व्यापारीवर्गाच्या वतीने नितीन जैन, नंदू डागा, ओमप्रकाश राका, मनोज जैन, प्रवीण कदम, विकाससिंग व नवीनकुमार सिंग यांनी प्रामुख्याने बाजारभाव वाढल्यास ताबडतोब निर्यातबंदी लादली जाते याकडे लक्ष वेधले. रॅक उपलब्धता, बंदरातील हाताळणी शुल्क कमी करण्यात यावे, सफेद कांद्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, वाहतूक अनुदान मिळावे आदी मागण्या केल्या.

शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने प्रामुख्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, विजय सदाफळ, ललित दरेकर, आप्पासाहेब चव्हाण, संजय जाधव, शिवाजी उगलमुगले, दिलीप गायकवाड, रामकिसन बोंबले, रामनाथ दरेकर, नीलेश पालवे, अनिल जाधव यांनी आयात-निर्यात धोरणातील धरसोडपणा थांबवून ते निश्चित करावे. तसेच कायमस्वरूपी निर्यात चालू ठेवावी, कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी आदी मागण्या मांडल्या.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, संतू पाटील-बोराडे, दगू गवारे, भाऊसाहेब भंडारे यांनी समितीला निवेदन दिले. बैठकीला लासलगाव बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, सुनील डचके, पंकज होळकर, मार्शल वाढवणे, सागर पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : कांदा उपाययोजना समिती लासलगावात appeared first on पुढारी.