नाशिक : कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव

कुंभमेळा नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांसाठी पंचवटीतील तपोवन परिसरात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामसह अन्य सुविधांसाठी सुमारे ३७५ एकर जागेचे भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या भूसंपादनाकरिता सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाकडे सादर केला असून, निधीची मागणी केली आहे. स्वनिधी खर्च करून भूसंपादन करणे अशक्य असल्यामुळे मनपाचे लक्ष आता केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

नाशिकला येत्या २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक नियोजन प्रशासनस्तरावर सुरू आहे. याबाबत विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साधुग्रामकरिता आरक्षित जागेपैकी संपादित आणि उर्वरित संपादित करावयाच्या जागेविषयीचा अहवाल मनपाकडे मागविला होता. त्यानुसार मनपाने अहवाल तयार केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या कामांविषयी बैठक घेत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी सिंहस्थ समन्वय समितीची बैठक घेत भूसंपादन तसेच इतरही विषयांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश खातेप्रमुखांना दिले होते. आजमितीस तपोवनात २६४ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण आहे. त्यापैकी १७ एकर जागा पार्किंग व अग्निशमन दलासाठी आरक्षित असून, ५४ एकर जागा मनपाने गेल्या सिंहस्थात प्रत्यक्ष वाटाघाटीद्वारे तसेच टीडीआरच्या माध्यमातून संपादित केलेली आहे. तसेच सुमारे १३.५० एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त अजूनही आरक्षित असलेल्या जागेची संपादन करण्याची आवश्यकता आहे. परंतु, मनपाकडे निधी नसल्याने हे भूसंपादन होऊ शकलेले नाही. संपादित करावयाची जागा आणि त्याचे रेडीरेकनर दर याबाबतचा अहवाल मनपाकडून भूसंपादन आणि नगररचना विभागाने तयार केला आहे. त्यानुसार जवळपास सव्वाचार हजार कोटींची भूसंपादनासाठी गरज असल्याचा अंदाज असून, इतका मोठा निधी खर्च करणे मनपाला शक्य नसल्याने मनपाने शासनाकडे प्रस्तावाद्वारे निधीची मागणी केली आहे.

कुंभमेळ्याच्या नियोजनाकरिता मनपास्तरावर सिंहस्थ समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठका सुरू असून, आता जिल्हास्तरीय समितीचे गठण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या समितीत आमदार, खासदार यांचा समावेश असेल.

रिंगरोडसाठी प्रोत्साहनात्मक टीडीआर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीगाव ते आडगाव या ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट हा ३६ मीटर रुंदीचा रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी इन्सेन्टिव्ह अर्थात, प्रोत्साहनात्मक टीडीआर देण्याबाबतचा प्रस्तावही मनपाने राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.