नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

क्राईम

नाशिक : पहिल्या मजल्यावरून पडल्याने ५५ वर्षीय बारकू शिवराम शेळके (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सादिक अब्बास शेख (रा. शिवाजीनगर) व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे दि. १३ मे रोजी बारकू शेळके काम करत होते. त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता किंवा साहित्य न देता त्यांना काम करण्यास सांगितले. पहिल्या मजल्यावर बिम भरताना ते वरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कामगारनगरला एकास मारहाण

नाशिक : कामगारनगर येथे अल्पवयीन मुलांच्या वादातून सातपूर पोलिस ठाण्यात दाेघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका १७ वर्षीय मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, इतर दोन संशयितांनी सोमवारी (दि. १५) रात्री ८.३० ला कामगारनगर परिसरातील उद्यानात मारहाण करीत धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली. या प्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

इंदिरानगरला देशी मद्यसाठा जप्त

नाशिक : इंदिरानगर येथील राजीवनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करीत संशयित बाबासाहेब रंगनाथ वाशिंबे यांच्याकडून २ हजार ६२५ रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला, तर दुसऱ्या घटनेत वडाळागावात फरीद कादर शहा यांच्याकडून दाेन हजार १०० रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला. दोन्ही कारवाया मंगळवारी (दि. १६) इंदिरानगर व गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केल्या. दोन्ही संशयित विनापरवाना मद्यविक्रीच्या प्रयत्नात आढळले. त्यामुळे दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

भाजलेल्या व्यक्तीचा मृत्यू

नाशिक : अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मखमलाबाद येथील पिंगळे गल्लीत घडली. देवीदास रामभाऊ गायकवाड (५०) असे मृताचे नाव आहे. त्यांनी २३ एप्रिलला राहत्या घराबाहेर स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने ते भाजले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि. १६) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

कल्पतरुनगरला महिलेची आत्महत्या

नाशिक : अशोका मार्गवरील कल्पतरुनगर परिसरात राहणाऱ्या मंजुषा राहुल भालेराव (३७) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

The post नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.