खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरालगत मुबलक पाणी साठा असून देखील नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव भरून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नसल्याची बाब आज माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणली. पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देणारे खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांची फसवणूक केली आहे. ही योजना धुळेकर जनतेला मृगजळ समान असल्याची टीका देखील त्यांनी केली.

धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचे स्त्रोत म्हणून ओळख असणारा नकाणे तलाव यंदा कोरडाठाक पडला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे महानगरपालिकेचे प्रशासनाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. नकाने तलाव यापूर्वी कोरडा झाला होता. त्यावेळी धुळे शहराला 29 दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. मात्र आज धुळे शहरालगत असणाऱ्या हरणमाळ, नकाने तलाव, डेडरगाव तलाव, तसेच अक्कलपाडा प्रकल्पासह तापी नदीवरील सुरवाडे बॅरेज मध्ये पुरेसे पाणी आहे. महाराष्ट्रातील एकाही शहराला नसेल एवढा पाणीसाठा धुळे शहरात उपलब्ध असताना धुळेकर नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. यापूर्वी संपूर्ण धुळे महानगर साठी डेडरगाव आणि नकाने तलाव हेच पर्याय होते. तेव्हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तापी योजना होती. मात्र सुरवाडे बॅरेज नसल्यामुळे उन्हाळ्यात तापी नदीचे पात्र कोरडे होत होते. परिणामी तापी नदीतील जल उपसा केंद्रा जवळ पाणी अडवून उपसा केला जात होता. पण धुळ्याला भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे आपण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दालनात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. यात पांझरा नदी पात्रा मधून सय्यद नगर ते नकाने यादरम्यानची योजना बनवली. यासाठी एक कोटी 53 लाख रुपयाचा खर्च येणार होता. हे काम 90 दिवसात पूर्ण करण्यात येणार होते. मात्र दिवस-रात्र काम करून 45 दिवसात ही योजना पूर्ण केली गेली. विशेषता एक कोटी 25 लाखात ही योजना पूर्ण होऊन उर्वरित पैसा सरकारला परत केला गेला या योजनेत साडेसात किलोमीटरचा एक्सप्रेस कॅनॉल तयार करून यातून पांझरा नदीच्या माध्यमातून अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी आणण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तीस वर्षे पूर्ण क्षमतेने न भरलेला नकाने तलाव ओसंडून वाहिला. धुळे शहराची पाणीटंचाई दूर झाली. आता या घटनेनंतर पुन्हा 24 वर्षानंतर नकाने तलाव पूर्णपणे कोरडा झाला आहे.

धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी ७०० कोटी रुपये आणल्याची माहिती एका कार्यक्रमात दिली. यात 165 कोटी रुपये पाणी योजनेवर खर्च झाल्याचे खासदार म्हणतात. मात्र त्यांनी धुळेकरांची फसवणूक केली आहे. या योजनेच्या माध्यमातून धुळेेकरांना मृगजळ दाखवले जात असल्याचा टोला त्यांनी यावेळी लावला. साक्री तालुक्यातील मालनगाव, पांजरा, जामखेडी प्रकल्प यंदा भरले आहे. अक्कलपाडा प्रकल्पात देखील पाणी आहे. या प्रकल्पातील दरवाजे उघडण्यात आले. मात्र या पाण्याच्या माध्यमातून नकाणे तलाव भरण्याची सूचना आपण करून देखील त्याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. मनपा भ्रष्टाचारात बुडालेली असल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही .त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. विशेषता धुळेकरांना महत्त्वाचा असलेल्या एक्सप्रेस कॅनॉलची आज दुर्लक्ष केल्याने मोठी दुरावस्था झाली आहे. या कॅनॉल मध्ये मोठे मोठे झाडे झुडपे वाढली असून देखभाल दुरुस्ती अभावी हा कॅनॉल निरुपयोगी ठरतो आहे. आज देखील अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी या कॅनॉलच्या माध्यमातून नकाणे तलावात आणल्यास 360 एम सी एफ टी पाणी साठा होईल. यातून धुळे शहराला 81 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. पाणी बाणी संदर्भात 2 जानेवारी 2003 रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ठरलेल्या उपाययोजनांवर काम झाले असते तर आज ही वेळ आली नसती. धुळेकरांना किमान एक दिवसानंतर पाणीपुरवठा करणे शक्य झाले असते. या बैठकांमध्ये डेडररगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दुप्पट करणे, नगाव बारी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र तयार करणे, डेडरगाव आणि नकाने तलावाची उंची वाढवणे, असे पर्याय सुचवले होते. यातून किमान 1000 एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला असता यातून धुळेकरांची पाण्याची तहान भागवणे शक्य होते. पण धुळ्यात दुष्काळ पाण्याचा नसून इमानदारीचा आहे. प्रत्येक कामात कमिशनची अपेक्षा करणारे इमानदारीत काम करू शकत नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच आपल्याकडे सत्तेची सूत्रे असती तर आपण ही वेळ येऊ दिली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप appeared first on पुढारी.