सिडको, नाशिक: पुढारी वृत्तसेवा – सिडको, अंबड परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, मे महिन्यात ३० दिवसांत भटक्या कुत्र्यांनी तब्बल २२३ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडको परिसरातील शिवाजी चौक, बडदेनगर ते खोडेमळा, इच्छामणी कॉलनी, वृंदावन कॉलनी, सावरकर चौक, महाराणा प्रताप चौक, लेखानगर, गणेशचौक, मोरवाडी, विजयनगर, पंडितनगर, अश्विननगर, सिंहस्थनगर, उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, शिवशक्ती चौक, शिवशक्तीनगर, खुटवडनगर तसेच आयटीआय सिग्नल, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, अंबड, अंबड औद्योगिक वसाहत, मळे परिसर, घरकुल व चुंचाळे या परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे.
मनपाच्या खत प्रकल्पाजवळ श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे. शस्त्रक्रियेनंतर कुत्रे अंबड भागात सोडून दिली जातात. यातून अंबडगाव, चुंचाळे तसेच औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. ही कुत्री हिंस्त्र असतात. कोंबड्या, शेळ्यांना लक्ष करतात. शेतकरी, कामगार व लहान मुलांना चावून जखमी करत आहेत. – शरद फडोळ, ग्रामस्थ.
रस्ते, चौकात मोकाट कुत्रे कळपाने ठाण मांडून असतात. वाहनांचा, प्रामुख्याने सायकली अथवा दुचाकींचा पाठलाग करतात. त्यांच्या भीतीने स्वार वेग वाढवतात अन् लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जातात. पादचारी तर दहशतीखालीच मार्गक्रमण करतात. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याचे प्रकार अधिक आहेत. जुने सिडकोतील भागात असलेल्या ठाकरे उद्यानातील जॉगिंग ट्रॅकवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांमुळे निवांत वावरता येत नाही. महिन्याभरातच २२३ जणांना श्वानदंशाला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गोविंदनगर, सदाशिवनगर, कर्मयोगीनगर व कॉलनी भागात मोकाट कुत्र्यांनी बालकांपासून ज्येष्ठांवर हल्ला करून जखमी केले आहे. मनपाकडे तक्रार करूनही या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. – कैलास चुंभळे, सामाजिक कार्यकर्ता
मनपाच्या मोरवाडी रुग्णालयात दररोजच कुणी ना कुणी श्वानदंशानंतर डोस घेण्यासाठी येतात. इंजेक्शनचा मुबलक साठा असून, रुग्णालयात २४ तास इंजेक्शन देण्याची सुविधा आहे. – डाॅ. विनोद पावस्कर, वैद्यकीय अधीक्षक, मनपा मोरवाडी रुग्णालय
हेही वाचा: