नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात विशेषत: तिसऱ्या श्रावणी सोमवारला शिवभक्तांची मोठी गर्दी होते. यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (दि. ४) त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जुन्या सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस धावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दीड दिवस सीबीएस ते टिळकवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मार्गावर एसटी बसेस धावणार आहेत.

शहर पोलिस आयुक्तालयाने तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरासह उपनगरांमधील शिवमंदिर परिसरात स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये जाण्यासाठी रविवारी (दि. ३) दुपारपासून सीबीएस परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत रविवारी दुपारी दोन ते सोमवारी रात्री आठपर्यंत सीबीएस सिग्नलसहित टिळकवाडीपर्यंतचे सर्व रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

सीबीएस सिग्नलकडून शरणपूर रोडने टिळकवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एसटी महामंडळ व सिटी बसेसला परवानगी असणार आहे. तर सीबीएस सिग्नलकडून टिळकवाडीकडे जाणाऱ्यांनी इतर वाहनधारकांना सीबीएस-मेहेर-अशोकस्तंभमार्गे गंगापूर रोड, तर शरणपूर रोडकडून येणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक पंडित कॉलनीमार्गे गंगापूर रोड, अशोकस्तंभ या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. हे नियम पोलिस, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू नसल्याचे वाहतूक पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.