नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

बनावट नोटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. तर या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) या खटल्याचा अंतिम निकाल समोर आला असून, आरोपींनी अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचविल्याचे न्यायाधीश डाॅ. उमेशचंद्र मोरे यांनी नमूद केले आहे.

सुरगाणा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने उंबरठाण गावाच्या बाजारात ६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी साडेअकरा वाजता धाड टाकून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यामध्ये हरीश वाल्मीक गुजर (वय २९), बाबासाहेब भास्कर सैद (३८), अक्षय उदयसिंग राजपूत (२९), प्रकाश रमेश पिंपळे (३१, चौघे रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (२७), आनंदा दौलत कुंभार्डे (३५, दोघे रा. चांदवड) आणि किरण बाळकृष्ण गिरमे (४५, रा. निफाड) या सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी अक्षय राजपूत, प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर उर्वरित चौघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. आरोपी किरण गिरमे याने निफाड तालुक्यातील विंचूर येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये आरोपी आनंदा कुंभार्डेच्या मदतीने १०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा बनविल्या होत्या. इतर साथीदारांमार्फत त्या नोटा दोघांनी चलनात आणल्या होत्या. त्यावेळी आरोपींकडून शंभरच्या १९४ व पाचशेची एक, अशा १९ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

दरम्यान, या गुन्ह्याचा सखोल तपास करून पोलिस निरीक्षक एस. आर. कोळी यांनी संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. तर सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता आर. एल. निकम यांनी आठ साक्षीदार तपासले. हा गुन्हा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण करणारा गंभीर स्वरूपाचा अपराध आहे, असे न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.

परिस्थितीजन्य पुराव्यानुसार दोषी

या गुन्ह्यात आरोपींविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तपासी अंमलदार यांनी गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.