नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक महानगरपालिका pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्च २०२३ पर्यंत घरपट्टी वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या नाशिक महापालिकेला यंदा मात्र ही किमया साधता आली नाही. ऐन मार्च महिन्यात कर विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणुक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याने, कर वसुली विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट काठावर नेता आले. गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१० कोटी रुपये निश्चित केले होते. प्रत्यक्षात वसुली २०६.०३ कोटी रुपये इतकी करता आली. पाणीपट्टी वसुलीबाबत मात्र, वसुली विभाग फारच मागे असल्याचे दिसून आले. पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी असताना, प्रत्यक्षात वसुली ५४.०५ कोटी इतकी झाली आहे.

महापालिकेचा महसूल जीएसटी, पाणीपट्टी, घरपट्टी व विकास शुल्क यावर मोठ्या प्रमाणावर आधारलेला आहे. त्यापैकी जकातीच्या बदल्यात शासनाकडून दर महिन्याला महापालिकेला परतावा प्राप्त होत असतो, तर उर्वरीत महसुलाचे स्त्रोत हे मनपालाच तयार करावे लागतात. त्यामुळे मनपा प्रशासनाचा सर्वाधिक भर घरपट्टी, पाणीपट्टी आणि विकास शुल्क यावर असतो. त्यादृष्टीने कर विभागाकडून वसुलीसाठी प्रयत्न केले जातात. मार्च २०२३ पर्यंत कर वसुली विभागाला तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रारंभी १७५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यात नंतर वाढ करून ते १८५ कोटी इतके केले गेले. कर विभागाने तारेवरची कसरत करीत १८७ कोटींची वसुली करून शंभर टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यामुळे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत घरपट्टी वसुली उद्दिष्टात वाढ करून २१० कोटी निश्चित केले होते. यावेळी देखील कर विभागाने वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी ढोल बजाओ असो वा अन्य मोहिमाही राबविल्या गेल्या. मात्र, मार्चमध्ये वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या गेल्याने २१० कोटींचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, अशातही गेल्यावर्षीच्या तुलनेत १७.१९ कोटींची अधिकची वसुली केली आहे.

दरम्यान, मनपाच्या सहा विभागापैकी सर्वाधिक घरपट्टी वसुली सिडको विभागातून ४३.४४ कोटी इतकी झाली आहे. त्यानंतर पंचवटीमधून ३९.५१ कोटी, नाशिक पश्चिममधून ३४.१६ कोटी, नाशिक पूर्वमधून ३४.१६ कोटी, नाशिकरोड भागातून ३१.९० कोटी, सातपूरमधून २२.९८ कोटी इतकी वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या सवलत योजनेचा वसुलीसाठी मोठा लाभ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

नाशिकरोडमधून सर्वाधिक पाणीपट्टी वसुली
पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ते ५४.०५ कोटी इतकेचे पूर्ण करता आले. यामध्ये सर्वाधिक पाणीपट्टी नाशिकरोडमधून ११.७२ कोटी वसुली झाली आहे. पाठोपाठ सिडकोतून ११.२८ कोटी, पंचवटी ८.१८ कोटी, नाशिक पूर्वमधून ९.९६ कोटी, नाशिक पश्चिमधून ६.९८ कोटी तर सातपूरमधून ५.९३ कोटी इतकी वसुली झाली आहे.

देयक वाटपासाठी ठेकेदाराची नियुक्ती
घरपट्टी, पाणीपट्टीचे देयके वाटपासून खासगीकरणातून ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वसुलीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू आर्थिक वर्षे निवडणूकीचे असल्याने, ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण होण्याची गरज आहे. अन्यथा या वर्षात वसुलीच्या उद्दिष्टावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

The post नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल appeared first on पुढारी.