नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे गावजेवणात जातीनिहाय पंगतीची कुप्रथा अखेर मोडीत काढली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याबाबत आवाज उठविल्यानंतर ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने ही प्रथा सुरू होती.
लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी त्यांची वेगळी पंगत बसविण्याची ही प्रथा होती. त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्टकडून (Trimbakeshwer Mahadevi Trust) लोकवर्गणी काढून गावजेवणाचे प्रयोजन केले जात होते. यामध्ये साधारणत: दहा हजारांपेक्षा अधिक लोक जेवण करतात. परंतु, ही प्रथा पाळताना विशिष्ट समाजाच्या भोजणासाठी लागणारे अन्न वेगळ्या पद्धतीने शिजवले जात होते. तसेच या समाजाची वेगळी पंगत बसविली जायची. ही पद्धत जातीय व्यवस्थेला खतपाणी घालणारी असून, देशाच्या राज्य घटनेची पायमल्ली करणारी असल्याचे सांगत मागील वर्षापासून अंनिस (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) त्यास विरोध करीत आहे. गेल्यावर्षी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर तहसीलदार व पोलिस यांनी प्रशासनाला निवेदन देत ही कुप्रथा थांबविली होती.
मात्र, यावेळी पुन्हा ३ मे रोजीच्या गावपंगतमध्ये जातीनिहाय जेवणाच्या पंगती बसविल्या जाणार असल्याची बाब समोर आल्यानंतर पुन्हा अंनिसने ही प्रथा बंद करण्याची मागणी केली. लोकांच्या इच्छेने गावजेवण होत असेल तर सर्वांसाठी एकत्र अन्न शिजवले जावे. तसेच एकत्र पंगतीत जेवणाचा आनंद घ्यावा, अशी मागणी अंनिसने केली होती. त्या आशयाचे त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती, पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासन संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विषमतेला खतपाणी घालणारी प्रथा बंद केली. दरम्यान, यासाठी अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, कार्यवाह कृष्णा चांदगुडे, कार्याध्यक्ष संजय हरळे, दिलीप काळे यांनी ही कुप्रथा संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले.
संस्थेच्या ट्रस्टींना समज
त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी संबंधित संस्थेच्या ट्रस्टींना कायदेशीर समज देऊन समाजात विषमता निर्माण करणारी ही प्रथा बंद करावी, अशा आशयाचे पत्र बजावले. पोलिसांनी देखील कायद्याचे पालन करून एकोप्याने हा उपक्रम राबवावा, असे सांगितले. त्यानंतर ट्रस्टींनी याविषयी निर्णय घेऊन वर्षानुवर्षे वेगळ्या पंगतीची प्रथा बंद करण्याचे स्पष्ट केले.
ही कुप्रथा मागील वर्षीच थांबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी पुन्हा जातीनिहाय पंगती बसविल्या जाणार असल्याची चर्चा पुढे आल्याने अंनिसच्या जिल्हा व राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून त्याविरोधा आम्ही लढा दिला. त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले आहे. – संजय हराळे, कार्याध्यक्ष, अंनिस, त्र्यंबकेश्वर.