नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड-लिंक रोड भागात विराटनगर येथे कार मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुरडीच्या अंगावरून गेल्याने यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
आयजा अमजद खान असे ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विराटनगर येथे अमजद खान हे पत्नी व १४ महिन्यांच्या मुलीसमवेत राहत होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ते घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांची मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे हसनेन खान हे कार ( एमएच १५, एचक्यू ५६८६ ) मागे घेत असताना कारच्या मागे खेळत असलेली आयजा हिच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी अमजद खान यांच्या फिर्यादीवरून संशयित हसनेन खान यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांनी संशयित हसनेन खान यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रवींद्रकुमार पानसरे करीत आहेत.
हेही वाचा :
- Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री
- पुण्याचा रिंगरोड होणार देशात सर्वोत्तम ; 30 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू
- पुणे : शिवजयंती तयारीच्या बैठकीचा राजकीय मंडळींना विसर ; केवळ दोन माजी नगरसेवक उपस्थित
The post नाशिक : वडिलांच्या डोळ्यांसमोर १४ महिन्यांच्या चिमुरडीला कारने चिरडले appeared first on पुढारी.