नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहाही उमेदवारांनी शुक्रवारी (दि. १७) खर्च निरीक्षकांकडे खर्चाचा तपशील सादर केला. उमेदवारी खर्चात डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली असून त्यांचा २५ लाख रुपये खर्च झाला आहे. आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रचार व अन्य बाबींवर १७ लाखांचा खर्च केला. सदरचा खर्च १४ मेपर्यंतचा आहे. मतदान पार पडल्यानंतर बुधवारी (दि.२२) पूर्ण खर्च सादर करावा, अशा सूचना खर्च निरीक्षक मुकांबिकेयन एस. आणि निधी नायर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. शनिवारी (दि.१८) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उमेदवारांकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रचारावर भर दिला जात आहे. प्रचाराच्या या धामधूमीत दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांची तिसरी खर्च तपासणी पार पडली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या खर्च ताळमेळ बैठकीप्रसंगी खर्च निरीक्षक मुकांबिकेयन एस. आणि निधी नायर यांनी दहाही उमेदवारांकडील खर्चाचा तपशील व कागदपत्रे घेतली. सदर तपासणीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या उमेदवारांचा खर्च अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
- प्रमुख उमेदवार खर्च
- भारती पवार : २५ लाख १६ हजार
- भास्कर भगरे : १६ लाख ९९ हजार
उमेदवारांच्या खर्च तपासणीसाठी पथक उपस्थित होते. सहायक नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे, क्षेत्रीय नोडल अधिकारी गोविंद कतलाकुटे, लेखांकन चमू नियंत्रक जलपत वसावे, सहायक खर्च निरीक्षक (मुख्यालय) प्रसाद कुलकर्णी यांसह लेखा अधिकारी राजेंद्र कोठावदे, लखीचंद बाविस्कर, खलील पटेल, नितीन नंदन, संतोष नायर, अनिल उमरे आदींनी खर्चाची तपासणी केली. सर्व उमेदवारांनी सोमवारी (दि.२०) म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंतचा खर्चाचा तपशील त्यांची खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रांसह २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षात खर्च सादर करावा, असे आवाहन खर्च निरीक्षक यांनी केले आहे.
हेही वाचा: