Latest News on Nashik Onion : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अखेर लिलाव सुरळीत

नाशिक कांदा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या २० दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बहिष्कारामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी (दि.२२) पासून सुरळीत सुरू झाले. मात्र, मनमाड बाजार समितीत तोडगा न निघाल्याने येथील लिलाव बंदच होते. तर पिंपळगाव बसवंत येथे सकाळी सुरळीत झालेले लिलाव सायंकाळच्या सत्रात पुन्हा बंदची अधिसूचना निघाल्याने बंद झाले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी येथील लिलाव ठप्प होण्याची शक्तता आहे.

गेल्या 20 दिवसांपासून जिल्ह्या्तील बाजार समित्यांमध्ये व्यापारी, हमाल- मापारी व बाजार समित्या यांच्यात लेव्हीच्या वादातून कांदा लिलाव बंद होते. याबाबत वारंवार बैठका घेऊनही ताेडगा निघत नसल्याने सुरुवातीला खासगी बाजार समित्यामधून कांदा लिलाव सुरू करण्यात आले होते. असे असले तरी प्रमुख बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. अखेर याबाबत उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसा पाठविल्याने सोमवारी मनमाडवगळता सर्वच बाजार समित्यांतील लिलाव सुरू झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या २० दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या बहिष्कारामुळे कामकाज बंद होते. त्यामुळे सुमारे ८०० ते ९०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी दिलेल्या गंभीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवार (दि.२२)पासून मनमाड वगळता जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सुरळीत झाल्या असल्याचे सहकार विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असतानाही सोमवारी चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच होते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल-मापारी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडला जात होता.

लेव्हीच्या प्रश्नामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होते. गेल्या सोमवारपासून दिंडोरी बाजार समितीत पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. या बंदमुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होत झाला असून, व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासक व सहकार विभागाने देऊनही व्यापारी आदेश धाब्यावर बसवीत असल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, मनमाड बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतही प्रशासनाने लक्ष घालत मार्ग काढण्याची मागणी येथील ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गाने केलेली आहे. याबाबत सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सूचना दिल्या असल्याचे समोर आले आहे.