नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्याच्या वाहतुकीवर साधारणत: पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसगाड्यांच्या भाड्यापोटी दोन कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
लोकसभेच्या पाचव्या टप्यात जिल्ह्यातील नाशिक व दिंडाेरी तसेच धुळे-मालेगाव मतदारसंघामध्ये २० मे रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यातील ४ हजार ८०० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाकरिता नियुक्त १८ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ईव्हीएम तसेच मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी वाहने प्रशासनाने अधिग्रहित केली. त्यामध्ये ५२४ बसेससह एकूण १ हजार २५२ वाहनांचा समावेश होता. यासर्व वाहनांच्या भाडेपोटी प्रशासनाला ५ कोटींचा खर्च आला आहे. त्यामध्ये ५५ रुपये प्रतिकिलोमीटर दराने बसगाड्यांना खर्च करावा लागला. तर जीप, ट्रक व कारकरिता प्रतिकिलोमीटर सुमारे ४५ ते ५० रुपये दर मोजण्यात आले. याशिवाय नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातंर्गत येणारा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉगरूम ते अंबड येथील गोदामापर्यंत ईव्हीएम वाहतूकीसाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ३६ बसगाड्यांचा वापर करण्यात आला. या वाहतुकीवरदेखील प्रशासनाचा खर्च झाला आहे.
अंतिम खर्चाचे आकडे बाकी
लोकसभा निवडणुकीतंर्गत अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान तसेच मतमोजणीपर्यत विविध टप्पे आहेत. या प्रत्येक टप्यावर निवडणूक शाखेकडून खर्च करण्यात आला. मतमोजणी व त्यानंतर ईव्हीएमची सैय्यद पिंप्री गोदामापर्यंतची वाहतूक बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीवरील झालेल्या खर्चाचे एकूण अंतिम आकडे येणे बाकी आहेत.
हेही वाचा: