नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील जागेवरून महायुतीत रणकंदन सुरू असून, जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असले, तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपला दावा कायम ठेवून आहेत. ते रविवारी (दि. १४) पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले होते. याठिकाणी त्यांनी तिकिटासाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर यांची नावे समोर आल्यापासून, तिकिटासाठी सेनेतच स्पर्धा वाढल्याचे चित्र आहे.
जिल्हाप्रमुख बोरस्ते दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यात गेल्याचे समजताच हेमंत गोडसे यांनी कल्याण गाठत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत त्यांना अपेक्षित आश्वासन मिळाले नसल्याने, त्यांनी रविवारी ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांच्या शुभ-दीप निवासस्थानी त्यांची भेट घेणे संयुक्तिक समजले. या भेटीत गोडसे यांच्या पदरात नेमके काय पडले, ही माहिती समोर आली नसली, तरी सेनेतून बोरस्ते, करंजकर, चौधरी यांची नावे पुढे आल्यापासून हेमंत गोडसे प्रचंड अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी महायुतीत सध्या बैठकांचा धडाका सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांची नावे उमेदवारीसाठी पुढे आली असली, तरी दोघांविषयी नाराजी असल्याने महायुतीत तिसऱ्या पर्यायाचा शोध घेतला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, हेमंत गोडसे यांनी याआधी उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन करीत तीन ते चार वेळा ठाणे गाठले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत अपेक्षित उत्तर मिळाले नसल्याने, अजूनही त्यांच्या वाऱ्या सुरूच आहेत. दरम्यान, गोडसे यांच्या भेटीनंतर महायुतीत पुन्हा नाशिकच्या जागेवरून चर्चा होण्याची शक्यता आहे. अशात नाशिकच्या जागेवरून महायुतीत एकमत होणार काय? याची उत्सुकता नाशिककरांना लागली आहे.
नाशिकची विद्यमान जागा ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे नाशिकवर शिवसेनेचाच दावा कायम आहे. या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर लवकरच होणार आहे. शिवसेनेचा विषय असल्याने, त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. ही जागा शिवसेनेला मिळावी, असा नाशिककरांचा आग्रह आहे. या जागेवर कोणास उमेदवारी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. ते जो निर्णय घेतील, त्याचे आम्ही पालन करू. लवकरच याबाबतचा निर्णय होईल. – दादा भुसे, पालकमंत्री
जोपर्यंत अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर होईल, त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करणार आहोत. नाशिकची निवडणूक महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी तेथील वाटाघाटी झाल्या आहेत. काही निवडणुका दोन दिवसांत आहेत. तसेच काहींचे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरणे सुरू आहे. त्यामुळे तेथील वाटाघाटी आणि निवडणुकी याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. – छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकची एकमेव जागा शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघात दोन्ही वेळी शिवसेनेचे हेमंत गोडसे हे निवडून आले आहेत. साहजिकच आहे दोन टर्म निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी पुन्हा इच्छुक असणार आणि उमेदवारी मिळणे स्वाभाविक आहे. ते प्रयत्न करत आहेत. नाशिकच्या जागेचा तिढा सुटला पाहिजे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढणार आहे. उमेदवार कोण आहे, हे महत्त्वाचे नाही, तर धनुष्यबाण महत्त्वाचा आहे. – भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, उत्तर महाराष्ट्र.
The post पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्या भेटी-गाठी, तिकिटासाठी आग्रही भूमिका appeared first on पुढारी.