पिक विमा कंपन्या न्यायालयात गेल्याने अग्रीम रक्कम रखडली :  बिंदूशेठ शर्मा 

पिक विमा रक्कम

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पिक विम्याची अग्रीम रक्कम विमा कंपन्या न्यायालयात गेल्यामुळे रखडली आहे. मात्र यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आज भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनी पत्रकारांना दिली आहे. आपण राज्यभरातील शेतकऱ्यांचे विजेचे तसेच अन्य प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देत आहे. पण काही लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने माझ्यासारख्या शेतकरी मित्राची गरज भासते आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

धुळ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडीचे महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. प्रशासनातील अधिकारी स्तरावरील महत्त्वाच्या पदावरील अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत गंभीर नाही. त्यामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात रोहित्र बसवण्यासाठी देखील टाळाटाळ होते. मात्र आपण पाठपुरावा केल्यानंतर अनेक रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा चा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांना एका रुपयामध्ये पीक विम्याचे संरक्षण दिले गेले. मात्र त्याच्या अग्रमी रक्कम देण्यात मोठी अडचण निर्माण झाली. पीक विमा कंपन्या स्कायमेटच्या आधारावर सर्वेक्षण करतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्या गावांमध्ये पिकाच्या नुकसानीचा अंदाज लावण्यात गल्लत होते. मात्र त्यावर उत्पन्नावर आधारित नुकसानीचा मुद्दा पुढे आणला असून त्यावर आधारित पिक विमा दिला जाणार आहे .धुळे जिल्हा संदर्भात पीक विमा कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळेच अग्रीम देण्यात अडचण निर्माण झाली आहे. तरीही सरकार स्तरावरून या कंपन्यांना 25% अग्रीम देण्याची सूचना देण्यात आली आहे. हा प्रश्न लवकरच सोडवण्यात यश येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. बँकेकडून देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले जाते आहे. पीक नुकसानीचे अनुदान खात्यात आल्यानंतर बँकेच्या माध्यमातून हे अनुदान कर्ज खात्यात वळती केले जाते. ही बाब अन्यायकारक आहे.धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असल्यामुळे महाराष्ट्रभरातील शेतकरी आपल्याला समस्या सांगतात. या समस्या सोडवण्यासाठी आपला अव्याहातपणे पाठपुरावा सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली .आता राजकीय स्तरावर आपण धुळे लोकसभेच्या जागेसाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या नवोदित चेहऱ्याला संधी द्यावी, अशी आपली मागणी असून पक्ष स्तरावरून आपल्याला संधी दिली गेल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करू. असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post पिक विमा कंपन्या न्यायालयात गेल्याने अग्रीम रक्कम रखडली :  बिंदूशेठ शर्मा  appeared first on पुढारी.