‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

पीएफ ऑफिस नाशिक,www.pudhari.nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कामगारांचा तब्बल १० लाखांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याचे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्तासह तिघांना अटक झाली. ही कारवाई केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून, या तिन्ही संशयितांना दि. 1 जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी सरते वर्ष आणि नववर्ष कोठडीतच जाणार आहे.

तक्रारदार हे स्थानिक बांधकाम उद्योजक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा आणि खासगी पीएफ सल्लागार बी. एस. मंगलकर अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत.

तक्रारदाराने ईपीएफओ कार्यालयाकडे त्यांच्या बँक खात्यांचे विवरणपत्र सादर केले होते. त्याच्या तपासणीनंतर आहुजा यांनी कंपनीने कर्मचाऱ्यांचा १० लाख ५० हजार रुपयांचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याची क्युरी काढत प्रकरण थांबविले होते. ते निकाली काढण्यासाठी आयुक्त आरोटे व आहुजा यांनी मंगलकर याच्या माध्यमातून दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याविषयी संबंधिताने ‘सीबीआय’च्या एसीबी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने आरोटे, आहुजा व मंगलकर यांनी लाच मागितल्याचे प्राथमिक पुरावे संकलित करत बुधवारी (दि. 27) रात्री सापळा रचला. त्यात मंगलकर हा दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अडकला. पथकाने तत्काळ आहुजालादेखील ताब्यात घेतले आणि त्यांची स्वतंत्र चौकशी केली. त्यात आयुक्त आरोटे यांचाही सहभाग समोर आल्यानंतर त्यांनाही रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. तीन संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. 1 जानेवारीपर्यंत सीबीआय पोलिस कोठडी सुनावली गेली. त्यानुसार पथक त्यांना घेऊन मुंबई कार्यालयात रवाना झाले. वर्षाअखेरीस झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

संशयितांच्या घराची झाडाझडती

या कारवाईत विभागीय आयुक्तासह अधिनस्त अधिकारी आणि खासगी एजंट हाती लागल्यानंतर पथकाने तत्काळ पुराव्यांसह इतर अपसंपदेचा शोध घेण्यास धावपळ केली. त्यानुसार आरोपींशी निगडीत ठिकाणांची झडती घेतली गेली. आरोटे, आहुजा आणि मंगलकरच्या निवासस्थानी व कार्यालयातून काही रोकड आणि खरेदी-विक्रीसह काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येते. सीबीआयचे डीआयजी डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा ;

The post 'पीएफ' आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.