पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

arrestedपोल्ट्री फार्मच्या आडून तयार करायचे दारु www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध मद्यविक्रेत्यांनी मद्यविक्री निर्मितीसाठी अनेक फंडे वापरले. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत विविध फंडे उघड केले. असाच एक प्रकार बेलगाव कुऱ्हे येथे उघड झाला. पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारू तयार करत असलेल्यांविरोधात विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वा चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोल्ट्री फार्म चालक व सुरक्षारक्षकास अटक केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे गावाजवळ मल्हार पोल्ट्री फार्म आहे. विभागास मिळालेल्या माहितीनुसार, भरारी पथक एकने या ठिकाणी चार दिवस पाहणी केली. त्यात दोनपैकी एका पोल्ट्री फार्ममध्ये मद्यनिर्मिती केली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे पथकाने कारवाई केली. यात पोल्ट्री शेडमध्ये दारू बनवण्याचा कारखाना उभारल्याचे आढळून आले. तसेच जमिनीत स्पिरीटचे ड्रम गाडल्याचे दिसले. त्यामुळे पथकाने येथून ६५० लिटर स्पिरीट, ९, ७५० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, एक हजार लिटरच्या दोन टाक्या, इलेक्ट्रिक व्हेडिंग मशीन, दोन मोटार, ऑटोमेटिक बॉटलिंग मशीन, प्लास्टिक ट्रे, आरओ मशीन, बनावट लेबल, कागदी पुठ्ठे, डिंक, रिकामे ड्रम आदी १४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्म चालक संजय भीमाजी गुळवे याच्यासह सुरक्षारक्षक बच्चू मंगा भगत यास अटक केली आहे. दोघांविराेधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक आर. सी. केरीपाळे, जवान सुनील दिघोळे, कैलास कसबे, राहुल पवार, विजेंद्र चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा :

 

The post पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक appeared first on पुढारी.