प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

धुळे राहुल गांधी www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस ते पंचवीस उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या देशात उद्योगपतींचे कर्ज माफ होते. पण शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवा उद्योजक यांना कर्जमाफी दिली जात नाही. हा अन्याय आहे. मनरेगा योजनेसाठी एका वर्षासाठी 65 हजार कोटी रुपये लागतात. पण पंतप्रधान मोदी यांनी 20 ते 25 लोकांचे सोळा लाख करोड रुपये कर्ज माफ करून मनरेगाचा 24 वर्षांचा पैसा त्यांच्या घशात घातल्याचा खळबळजनक आरोप आज काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यात केला. यावेळी झालेल्या महिला न्याय मेळाव्यात त्यांनी महिला विकासाची पंचसूत्री देखील जाहीर केली. काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना या पंचसूत्रीच्या माध्यमातून न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Rahul Gandhi Dhule)

काँग्रेसच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज धुळ्यात आगमन झाले. यावेळी महात्मा गांधी पुतळा ते चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान रोड शो करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनतेला दोन ठिकाणी संबोधन केले. यात त्यांनी केंद्र शासन दुटप्पी असल्याचा आरोप केला. त्यानंतर झालेल्या महिला न्याय हक्क परिषदेत महिला विकासाची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. या सभेमध्ये काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे तसेच आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, खासदार चंद्रकांत हांडोरे, तसेच रजनी पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. (Rahul Gandhi Dhule)

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेला फसवत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. आपण यापूर्वी चार हजार किलोमीटर ची कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यानची यात्रा काढली. या यात्रेत आपण लाखो लोकांना भेटलो असून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले. यात जनतेने मणिपूर, ओरिसा, बिहार, नॉर्थ ईस्ट ची राज्य या भागात रॅली काढली गेली नसल्याबद्दल विचारले. त्यामुळे आपण आता मणिपूर ते मुंबई अशी रॅली काढली आहे. या रॅलीला आपण न्याय हा शब्द जोडला आहे. भारतामधील 90 टक्के लोकांबरोबर दररोज वेगवेगळ्या मार्गाने अन्याय होतो. भारतात 22 लोकांकडे सर्वांधिक पैसा आहे. देशातील 70 करोड लोकांकडे असलेला पैसा इतका रक्कम या 22 लोकांकडे आहे. तरीही सरकार 16 लाख करोड कर्जमाफी देऊन अरबपतींना संधी देते. मात्र गरिबांच्या बाबतीत हा विचार होत नाही. मनरेगाची काम करण्यासाठी एका वर्षाला 65 हजार करोड रुपये लागतात .तर मोदी यांनी 20 ते 25 लोकांचे 16 लाख करोड रुपये कर्ज माफ केले. यातून 24 वर्षांचा मनरेगाचा पैसा नष्ट झाला. सरकार अरब पतींचे कर्ज माफ करते. मात्र शेतकरी शेतमजूर महिला यांचे कर्ज माफ करत नाही. हा खऱ्या अर्थाने आर्थिक अन्याय आहे, असा आरोप त्यांनी केला. (Rahul Gandhi Dhule)

या देशातील मोजकेच लोक मीडिया चालवतात. हे लोक शेतकऱ्यांची समस्या दाखवत नाहीत. उद्योगपतींची झालेल्या कर्जमाफी बद्दल बोलत नाहीत. तर 24 तास पंतप्रधान मोदी यांचा चेहरा दाखवतात, अशी टीका त्यांनी केली. देशात विकासासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते. मात्र लाभाची भागीदारी देण्यासाठी शेतकऱ्याला उभे केले जात नाही. असे त्यांनी सांगितले.

 महिलांसाठी या पाच घोषणा (Rahul Gandhi Dhule)

या सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महिलांची पंचसूत्री जाहीर केली. हा धागा पकडत खासदार राहुल गांधी यांनी या पंचसूत्री ची माहिती देखील दिली. या पुढील काळात काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येक गरीब महिलेच्या बँक खात्यात एका वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे पन्नास टक्के आरक्षण ठेवले जाईल. तसेच देशभरातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र शासनाकडून दिला जाणारा भाग दुप्पट केला जाईल. देशभरात पंचायत समिती स्तरावर अधिकार मैत्री फोरम तयार केला जाईल. या फोरमच्या माध्यमातून महिला अधिकारांवर जागृती बरोबरच लढा उभारला जाईल तसेच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रातील या कर्मभूमीतील प्रत्येक जिल्ह्यात आता एक महिला हॉस्टल सुरू केले जाईल अशी पंचसूत्री यावेळी स्पष्ट करण्यात आली.

सरकार येताच जातनिहाय जनगणना

या देशातील आर्थिक इकॉनोमी आणि देशातील प्रत्येक संस्थांचा सर्वे केला जाणार आहे. या डेटा मध्ये महिला, दलित, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय यांचा नेमका किती सहभाग आहे .याविषयीची बाब स्पष्ट केली जाणार आहे .काँग्रेसचे सरकार येताच या देशात जातीय निहाय जनगणना केला जाईल. त्याचप्रमाणे आर्थिक सर्वे करत असतानाच संस्थांचा देखील सर्वे केला जाईल. यातून कोणत्या संस्थेत कोणाचा किती सहभाग आहे. ही बाब स्पष्ट होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

कैसे है आप दाजीसाहब, गळाभेट करीत राहूल गांधीनी केली विचारपूस, थेट सोनिया गांधींशी साधला मोबाईलवरून संपर्क

भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कैसे है दाजी साहब! असं विचारीत थेट त्यांनी गळाभेट करीत आलिंगन दिले. यावेळी खासदार गांधी यांनी रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची व वैद्यकीय उपचाराची माहिती घेतली. यावेळी रोहिदास पाटील यांच्या धर्मपत्नी लताताई रोहिदास पाटील यांची राहुल गांधी यांनी  सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून श्रीमती गांधी यांनी तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार कुणाल पाटील अश्विनी कुणाल पाटील, नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, डॉक्टर दिलीप पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

The post प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा appeared first on पुढारी.