प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप

Vidio Survey pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील दोन मुख्य लोकसभा मतदारसंघांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. २० मे रोजी मतदान, तर दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिकसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, तर दिंडोरीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी हे अपर जिल्हाधिकारी असणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून, त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

या लोकसभा निवडणुकीसाठीच्या कार्यक्रमामध्ये दि. २६ एप्रिल ते ३ मे या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ४ मे रोजी होणार असून, उमेदवारांची माघारी मुदत दि. ६ मे रोजी दुपारी ३ पर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे. मतदान दि. २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे तर मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे.

जिल्ह्यामध्ये दिंडोरी आणि नाशिक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी १२ विधानसभा मतदारसंघ नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आहेत तर उर्वरीत मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत.

मतदारांची संख्या
आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ४७ लाख ८६ हजार ९०३ मतदार आहेत. यामध्ये २४ लाख ९३ हजार १५५ पुरुष तर २२ लाख ९३ हजार ६३८ महीला मतदारांचा समावेश आहे. तसेच ११ तृतीयपंथी आणि ८ हजार १८८ सैनिक मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणी नामनिर्देशनाच्या १० दिवस पुर्वीपर्यंत सुरु असल्याने अजूनही युवा मतदार नोंदणी करत असून ही संख्या वाढणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

या विधानसभा मतदारसंघाचा समावेश
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये : नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मतदान केंद्र
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी १९१० तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १९२२ मतदानकेंद्रे असणार आहे.

वयोवृद्ध मतदार
निवडणूकीमध्ये ८५ हून अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये १२ ड हा अर्ज भरून देण्याची प्रक्रीया बीएलओंच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहीती अधिकार्यांनी दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ८५ हून अधिक वयाचे २४ हजार ९३९ मतदार आहेत, यामध्ये ११ हजार ५३६ पुरुष तर १३ हजार ४०३ महीला मतदार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये २४ हजार ८१६ मतदार आहेत, यामध्ये ९ हजार ७१८ पुरुष तर १५ हजार ९८ महीला मतदार आहेत.

दिव्यांग मतदार
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ७ हजार ५ दिव्यांग मतदार आहेत, यामध्ये ४ हजार ३१८ दिव्यांग पुरुष तर २ हजार ६८७ दिव्यांग महीला मतदार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये १० हजार ९४० दिव्यांग मतदार आहेत, यामध्ये ६ हजार ७३८ दिव्यांग पुरुष तर ४ हजार २०२ दिव्यांग महीला मतदार आहेत.

आचारसंहितेसाठी पथके
लोकसभा निवडणूकीसाठीच्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघानिहाय फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहेत.

सी-व्हिजील ॲप
निवडणूक काळात प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. कोणी उमेदवार जर मतदारांना काही प्रलोभने दाखवत असेल आणि याबाबत कोणाही मतदाराला तक्रार करावयाची असेल तर सी-व्हिजील ॲपवर फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करुन तक्रार करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

The post प्रलोभनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सी-व्हीजील ॲप appeared first on पुढारी.