फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना भरविले पेढे; दिवंगतांना श्रद्धांजली

मराठा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठ्यांचा समुदाय नवी मुंबई येथील वाशी मार्केट येथेच रोखत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आला. सीबीएस येथील शिवतीर्थावर नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांच्या आतषबाजीने विजयोत्सव साजरा झाला. यावेळी मराठा बांधवांनी पोलिस आणि पत्रकारांनाही पेढे भरविले.

यावेळी अण्णासाहेब पाटील, क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे-पाटील, अण्णासाहेब येरळीकर, प्रा. देवीदास वडजे, विनायक मेटे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शेकडो समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मराठायोद्धा जरांगे-पाटील जो निर्णय घेणार, त्या निर्णयाबरोबर नाशिक जिल्हा एकसंध राहून त्यांना साथ देत राहील. जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण जिल्हा उभा राहणार असल्याचा ठराव मराठा क्रांती माेर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी मांडला असता, त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी सर्व समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह थोर महापुरुषांच्या नावाने विजयी जयघोष केला.

याप्रसंगी नानासाहेब बच्छाव, शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, नितीन रोटे-पाटील, डॉ. सचिन देवरे, योगेश नाटकर, सोमनाथ जाधव, संजय फडोळ, मामा राजवाडे, राम खुर्दल, हर्षल पवार, वैभव दळवी, नीलेश मोरे, बाळासाहेब लांबे, कैलास खांडबहाले, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.

उपोषणकर्त्यांचा सत्कार
मराठा आरक्षणासाठी सलग १०५ दिवस साखळी उपोषण व सहा दिवस आमरण उपोषण करणारे नानासाहेब बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच ओबीसीतून आरक्षण घेण्यापासून अडवणाऱ्यांनी कितीही अडविले तरी, ते मराठ्यांनी मिळविले आहे. एक मराठा, लाख मराठा, मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत विजयाचा गुलाल उधळण्यात आला.

अनेक वर्षांपूर्वीचा मराठ्यांचा वनवास मनोज जरांगे-पाटील यांनी संपवल्याने, नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार. आरक्षणाच्या न्यायिक लढाईत मराठे विजयी झाले. तसेच पुढील काळात मराठा जरांगे-पाटील ज्या ज्या वेळेस आवाज देतील, त्या-त्या वेळी न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सर्व समाजबांधव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील. – करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा.

हा मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे. समाजाला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांसारखे प्रामाणिक नेतृत्व मिळाल्यामुळे समाजाने त्यांना साथ देत आरक्षणाचा लढा विजयाच्या रूपात परावर्तित केला. जरांगे-पाटील ज्या ज्या वेळेस समाजाबद्दल काही भूमिका घेतील, त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू. – नानासाहेब बच्छाव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा.

हेही वाचा:

The post फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना भरविले पेढे; दिवंगतांना श्रद्धांजली appeared first on पुढारी.