बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवाप्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची नक्कल काढून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली. तर एक जण फरार झाला. पोलिसांनी संशयितांकडून ५०० रुपयांच्या ४७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

पोलिस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या माहितीनुसार अशोक अण्णा पगार (४५, मु. पो. मेंढी, ता. सिन्नर, जि. नाशिक) व इतर तिघे हे नकली नोटा चलनात आणणार असून, त्यासाठी ते माउली लॉन्स भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलिस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक के. टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील, पवन परदेशी, तुषार मते, प्रवीण राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून सापळा रचला. यावेळी रात्री 2.30 च्या सुमारास संशयित पगार हा माउली लॉन्स येथे आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्याकडे 500 रुपये किमतीच्या बनावट 47 नोटा मिळून आल्या. यावेळी तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पगारला ताब्यात घेऊन अटक करून चौकशी केली असता, या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील हॉटेलमध्ये या बनावट नोटा केल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (३२, रा. वाशी, नवी मुंबई) याला नाशिकमधून अटक केली, तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. सोनार गल्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक) याला सिन्नर येथे सापळा रचून अटक केली. चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार झाला. संशयतांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या, यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या नोटांचा वापर झाला का? आदींचा शोध पोलिस घेत आहेत. अंबड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

50 बनावट नोटा तयार केल्या

चार संशयितांनी एकूण ५० बनावट नोटा तयार केल्या होत्या. त्यातील ४७ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. एक नोट त्यांनी बाजारात चालविली व दोन नोटा बँकेत भरणा केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा –