नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) दुपारी शहरात दाखल होणार आहे. सारडा सर्कल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत त्यांचा रोड शो राहणार आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार रोड शो, चौक सभा या ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. यात दुतर्फा बंदोबस्त राहणार असून, आवश्यकतेनुसार उंच इमारतींवरही पोलिस राहतील तसेच साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात आहे. या बंदोबस्तात १०० पोलिस अधिकारी, ६०० पोलिस अंमलदार, १०० महिला यांसह कर्मचारी राहणार आहे.
खा. गांधी यांच्या रोड शो मुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी रोड शोचा मार्ग द्वारका ते सीबीएस या रस्त्यावर वाहतुकीस बंदी घातली असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार रोड शो मार्गात दुतर्फा बंदोबस्त तैनात केला असून शहरातील लॉज, हॉटेलची नियमित तपासणी केली जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. त्यानुसार द्वारका सिग्नल-सारडा सर्कल-फाळके रोड-दूधबाजार-त्र्यंबक पोलिस चौकी-खडकाळी सिग्नल-शालिमार चौक-इंदिरा गांधी पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-सीबीएस सिग्नल-त्र्यंबक नाका या मार्गावरून ‘रोड-शो’ होईल. त्यादरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. यासह गांधी यांची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार असल्याने तिथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेकडो पोलिसांचा फौजफाटा
पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांसह १०० पोलिस अधिकारी, ६०० पोलिस अंमलदार, १०० महिला अंमलदार, गुन्हे शाखेची तीन पथके, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखेमधील पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असेल.
बॅरिकेडिंग, साध्या वेशातील पोलिस
यात्रा मार्गात पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेडिंग उभारणार आहेत. त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलिसांचाही फौजफाटा तैनात राहणार आहे. उंच इमारतींवरही पोलिस राहणार असून, ते गर्दीवर लक्ष ठेवतील. नियंत्रण कक्षेमार्फतही प्रत्येक घडामोडींची नोंद घेतली जाणार आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर नजर राहणार असून, गरज भासल्यास त्यांना ताब्यात घेतले जाईल.
The post 'भारत जोडो' शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात appeared first on पुढारी.