दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेर भगरे जायंट किलर ठरले असून गेल्या वीस वर्षांपासून भाजपाचा गड असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवारांना पराभवाची धूळ चारणारे भास्कर भगरे नेमके कोण आहेत. ते जाणून घेऊया…
कोण आहेत भास्कर भगरे?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा पराभव करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे पेशाने शिक्षक असून, दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव हे त्यांचे गाव आहे. आई, चार भाऊ, तीन बहिणी, तर एक मुलगा व मुलगी असे त्यांचे कुटुंबीय असून, दोन्हीही उच्चशिक्षित आहेत.
भगरे यांनी गावचे सरपंचपद भूषविलेले असून, राष्ट्रवादीचे शाखाप्रमुख म्हणून राष्ट्रवादीत राजकीय प्रवास सुरू केला होता. पुढे खेडगाव पंचायत समितीची निवडणूक लढविली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले. पहिल्यांदाच तालुक्याच्या राजकारणात पाऊल टाकलेले भगरे पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीही राहिले आहेत. खेडगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, माजी आ. धनराज महालेंकडून त्यांचा पराभव झाला होता. पुढे महालेंनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भगरे विजयी झाले आणि जिल्हा परिषद सदस्य झाले. आपण खासदार होऊ हे त्यांनी स्वप्नातही कधी पाहिले नसावे. मात्र, महाविकास आघाडीने नवख्या भगरेंना उमेदवारी दिली त्यात त्यांनी दणदणीत विजय मिळविला.
काय आहे मतदारसंघाचा आजवरचा इतिहास?
२००४ साली झालेल्या तात्कालीन मालेगाव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत जनता दलाचे हरिभाऊ महाले यांचा पराभव करुन हरिश्चंद्र चव्हाणांनी हा मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात टाकला. त्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २००९ साली पुन्हा आ. नरहरी झिरवाळ यांचा पराभव करत भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी विजयश्री खेचून आणली. २०१४ ला पुन्हा राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवारांचा पराभव करुन हरिश्चंद्र चव्हाण विजयी झाले होते. तब्बल तीन पंचवार्षिक खासदार राहिलेल्या हरिश्चंद्र चव्हाणांचे तिकीट २०१९ ला ऐनवेळी कट करुन राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवारांना तिकीट दिले तर राष्ट्रवादीने शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी आ. धनराज महालेंना उमेदवारी दिली. त्यावेळी डॉ. भारती पवारांनी महालेंचा पराभव केला होता. सलग वीस वर्षांपासून या मतदारसंघात भाजपाची सत्ता होती, एकेकाळी संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामती नंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ संघ म्हणून दिंडोरी मतदारसंघाचा उल्लेख केला होता. त्या पाश्र्वभूमीवर पवारांनी आ. नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देऊन भाजपाचा गड खालसा करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर पहिल्या पासूनच पवारांचे लक्ष होते. राज्यात पक्ष फुटीला शरद पवारांना सामोरे जावे लागले. नाव आणि चिन्ह ही गेल्या नंतर देशपातळीवरची ही पहिलीच निवडणूक मात्र शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तिन्ही आमदार सोडून अजित पवार गटात गेल्यानंतर पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंना उमेदवारी देऊन डावपेच आखत भाजपाकडून दिंडोरी मतदारसंघ काबिज केला.
म्हणून भारती पवारांच्या वाट्याला पराभव
कांदा निर्यात बंदीबाबत पवारांनी घेतलेली भुमिका त्याला शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि केंद्रात पहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉ. भारती पवारांचे मतदारसंघात झालेले दुर्लक्ष, कांदा प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश पक्ष संघटनेशी नसलेला समन्वय, मतदारसंघात भरीव काम नाही, त्यामुळे डॉ. भारती पवारांना पराभवाचे धनी व्हावे लागले.