मतदानाचा हक्क बजवावा! जिल्हा प्रशासनाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकी अंतर्गत जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) मतदान घेण्यात येणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे.

शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या परिपत्रकानुसार पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी / कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले, तरीही निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशीची सुटी उद्योग विभागांतर्गतचे सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना लागू असेल.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी २ तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेत अवश्य मतदान करावे. मतदारांना योग्य ती सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य झाले नाही अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल.
-जलज शर्मा, जिल्हाधिकारी.

हेही वाचा: