नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील परिपत्रकानुसार आदेश देण्यात आले. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी /कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात येणार आहे. (Lok Sabha Election 2024)
मतदानाच्या दिवशी देण्यात येणारी सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यांना लागू असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. (Lok Sabha Election 2024)
अन्यथा कारवाई
मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता न येणे शक्य झाले नाही, अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- उन्मेष पाटील ‘मोदी का परिवार’ मधूनही बाहेर
- ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटात ‘उधळीन जीव’ हृदयस्पर्शी गाणं
- वेध लोकसभेचे – ‘मशाल’ चिन्हावर विजयी झाले होते मोरेश्वर सावे
The post मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी आणि सवलत appeared first on पुढारी.