१८ व्या लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्याने, भाजपसह सर्वच पक्षांची चिंता वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात असून, याबाबतची मोहीम गेल्या काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रात राबविली जात आहे. परिणामी परप्रांतीय कामगार मतदानाच्या हक्कासाठी आपल्या गावाकडे रवाना होत आहेत.
जिल्हाभरातील उद्योगांमध्ये चतुर्थ श्रेणीची कामे करणारे सुमारे एक लाखांपेक्षा अधिक परप्रांतीय कामगार आहेत. यातील बहुतांश कामगार मतदानासाठी आपापल्या गावाकडे रवाना झाले आहेत. सात टप्प्यात पार पडणाऱ्या लोकशाहीच्या या महोत्सवाचा पहिला टप्पा गेल्या १९ एप्रिलला पार पडला. पहिल्या टप्प्यात १९ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदारसंघांत मतदान झाले. या मतदारसंघात १६ कोटींहून अधिक मतदार असतानाही ६५.५० टक्केच मतदान झाले. २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.५० टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा त्यात घट झाल्याने, निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून मतदानासाठी देशभरात मोहीम राबविली जात आहे.
दरम्यान, नाशिकमधील उद्योग, व्यवसाय क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांचे मतदान आपल्या गावी असल्याने, बहुतांश कामगार मतदानाच्या हक्कासाठी गावाकडे रवाना झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होत असल्याने, त्या बेताने अनेकांनी गाव गाठले आहे. गेल्या आठवडाभरापासून कामगार गावी जात असल्याने, कंपन्यांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कामगारांच्या अनुपस्थित कामे पूर्ण करण्याचे उद्योजकांसमोर आव्हान आहे.
या राज्यातील कामगार
नाशिकमधील उद्योगांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून आलेले तरुण मोठ्या प्रमाणावर काम करतात. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तिन्ही श्रेणींमध्ये हे कामगार आहेत. जे परप्रांतीय कामगार कंपन्यांमध्ये कायम आहेत, ते येथेच स्थायिक झालेत. असे कामगार गावी गेले नाहीत. मात्र, जे अर्धकुशल, अकुशल कामगार आहेत, जे कंत्राटदारामार्फत रोजंदारीवर कामे करतात, असे जवळपास सर्वच कामगार गावाकडे परतले आहेत.
मतदानाचे पुढील टप्पे
दुसरा टप्पा – २६ एप्रिल, तिसरा टप्पा – ७ मे, चौथा टप्पा – १३ मे, पाचवा टप्पा-२० मे, सहावा टप्पा- २५ मे, सातवा टप्पा १ जून असून, चौथ्या टप्प्यात ओडिसा, मध्यप्रदेश, झारखंड या राज्यात मतदान आहे. तर सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात मतदान आहे. सध्या या राज्यातील कामगार गावाकडे रवाना झाले आहेत.
बरेच कामगार वर्षानुवर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याने, त्यांचे मतदान नाशिकमध्येच आहे. ज्या कामगारांचे मतदान नाशिकमध्ये नाही, ते कामगार गावाकडे रवाना झाले आहेत. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याची गरज आहे. – विकास माळी, सहाय्यक कामगार आयुक्त.
हेही वाचा: