नाशिक महापालिकेत सत्ता, तीन आमदार असे कधीकाळी वैभव असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झोळी काळओघाने पूर्ती रिती झाली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या मनसेला आता मात्र उमेदवारी कोणास द्यावी यावरून पेच पडला आहे. दस्तुरखुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीच याबाबतची खदखद व्यक्त केली असून, ५२ पत्यांचा कॅट पिसत बसण्यापेक्षा इतर पक्षातील सक्षम उमेदवारांच्या शोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेचे आगामी मिशन नाशिक लोकसभा हे आयात उमेदवारांच्या जीवावर तर नाही ना? याविषयी आता चर्चा रंगत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रत्येक पक्ष कंबर कसून आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी यापूर्वीच दंड थोपाटले आहेत. मनसेच्या गोटातूनही काहीशी चुळबुळ सुरू असतानाच, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यास पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने पक्षात एकही सक्षम उमेदवार नसल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. वास्तविक, यापूर्वीच मनसेनी कल्याण, ठाणे, पुणे, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, चंद्रपूर, रायगड या नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये नाशिकला स्थान दिले गेले नसल्याने, नाशिकबाबत मनसेची काय व्युहरचना असेल याबाबत चर्चा होती. आता पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार दिला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट केल्याने, पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. आता मनसे कोणत्या आयात उमेदवारांच्या शोधात आहे, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, राज ठाकरे नाशिक दाैऱ्यावर येण्यापूर्वीच अनेकांच्या पक्ष प्रवेशाविषयी चर्चा रंगली होती. त्यामध्ये भाजपमधील एका इच्छुकाचा समावेश होता. भाजपमधून तिकिट मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने हा इच्छुक इतर पक्षाच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. अशात मनसेकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न या इच्छुकाचा असल्याचे बोलले जात आहे. आता ठाकरे यांनी आयात उमेदवाराबाबतचे संकेत दिल्याने, मनसेचा आगामी लोकसभेचा उमेदवार हाच इच्छुक तर नाही ना? अशा चर्चेला आता उधाण आले आहे.
आता पदरात अपयश नको
राजकारणात पोच नसलेल्या टाळक्यांच्या जीवांवर निवडणुका लढवून पदरात अपयश पाडून घेण्याची माझी इच्छा नाही. माझ्या आणि इतर पक्षात काही लोकांना बरीच वर्षे झाली आहेत. मात्र त्यांना राजकीय पोच नसेल तर ५२ पत्यांचा कॅट किती काळ पिसणार? बाहेर अनेक सक्षम लोक आहेत, त्यांचा मी विचार करणार असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मनसेकडून इच्छूक
मनसेचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम आदी नाशिक लाेकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.
हेही वाचा :
- अभिव्यक्त होणे संवेदनशील माणसाचा धर्म
- व्हॅमनिकॉम’ परिषद : स्टार्टअपमुळे नवउद्योजकांना संधी : माजी मंत्री सुरेश प्रभू
- Kolhapur News : एसटीवर दगडफेक; सोमवार पेठेतील दोघांना अटक
The post मनसेचे मिशन नाशिक लोकसभा आयात उमेदवारावर ? राज ठाकरेंचे संकेत appeared first on पुढारी.