नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तुमच्या अंतर्गत गटबाजीचा वीट आला आहे. उठसूट मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येतात, तुम्हाला आता हे शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल, अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ‘नाशिककरांनी मला मतदान केले नाही म्हणून मी नाशिकला येत नाही, तर तुमच्या अंतर्गत गटबाजीमुळे मी येणे टाळतो’, अशा शब्दांत राज यांनी पदाधिकाऱ्यांवर त्रागा व्यक्त केला.
बऱ्याच काळानंतर राज ठाकरे नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून, दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शाखाप्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना सज्जड दम भरल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आगमन झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना राजगड पक्ष कार्यालयात बैठक न घेता, हॉटेलमधील सभागृहातच शाखा अध्यक्ष, विभागप्रमुख, महिला आघाडीचे अध्यक्ष यांचा ‘क्लास’ घेतला. बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांमध्ये काहीसा उत्साह होता. मात्र, राजसाहेबांनी सुरुवातीलाच ‘येथील एकही खबर बाहेर जाता कामा नये’ असा दम भरल्याने सभागृहात कमालीची शांतता निर्माण झाली. यावेळी राज यांनी, ‘मी नाशिकला का येत नाही’, असा सवाल उपस्थितांना विचारला. सत्ताकाळात कामे करूनही नाशिककरांनी मतदान केले नाही म्हणून आपण नाराज आहात असे सांगितल्यावर त्यास राज यांनी नकार दिला. दुसऱ्या एकाने गटबाजीमुळे आपण येत नाही, असे सांगताच बरोबर आहे, असे राज यांनी म्हटले.
त्यानंतर राज यांनी आपल्या शाब्दिक शैलीत दांडपट्टा सुरू केला. पाच ते सात मिनिटे सभागृहात शांतता होती. शाब्दिक टोलेबाजी करताना व्यासपीठ व समोरील खुर्च्यांवर बसलेल्या पदाधिकऱ्यांकडे बघून ते बोलत असल्याने त्यांचा रोख थेट पदाधिकाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी युवा नेते अमित ठाकरे, उपनेते अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
..तर पक्षातून चालते व्हा
मतदारांकडे कुठल्या तोंडाने मते मागायला जाऊ. मनसेच्या पाट्या आता अन्य पक्षाचे कार्यकर्ते काढायला लागले. आता शेवटचे इंजेक्शन द्यायला आलो आहे. तुमचे गाऱ्हाणे ऐकायला वेळ नाही. पक्षातील गटबाजी संपवा, पक्ष मजबूत करा, ज्यांना काम करायचे त्यांनी करा, अन्यथा पक्षातून चालते व्हा, असा सज्जड दम राज यांनी भरला. गटबाजी करू नका, एकोप्याने काम करा, संघटनेच्या कामांचा २० दिवसांनी आढावा घेऊ. कामात प्रगती दिसून आली नाही तर पदे काढून घेणार असल्याचे राज म्हणाले. आता यापुढे तक्रारी आल्यास सहन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी
शहरी भागातील पदाधिकारी ग्रामीण भागात फिरकत नाहीत. ग्रामीणमध्ये मोठे नेतृत्व नाही. पक्षाचे आंदोलन उभे राहिले नाही. अनेक संस्थांमध्ये संधी असूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळत नाही. पक्ष तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी केल्या असता, पंधरा दिवसांत तालुकानिहाय दौऱ्याचे राज यांनी आश्वासन दिले.
The post मनसेप्रमुख ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या appeared first on पुढारी.