मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय?

मराठा आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणावरून राजकारण्यांची कोंडी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पाचशे ते हजार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सकल मराठा समाजाकडून आता नव्या रणनीतीनुसार एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार आहे. २४ मार्च रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून समाजाची फसवणूक केल्याच्या भावनेतून मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत पाचशेपेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याचा विचार केला जात होता. त्यासाठी गुप्त बैठका घेऊन कोणी उमेदवारी अर्ज भरावा?, डिपॉझिटच्या रकमेची व्यवस्था कशी करावी? याबाबतचे नियोजन केले जात होते. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडीचशे ते तीनशे उमेदवारदेखील तयार झाले होते. मात्र, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी नवी रणनीती सांगितल्याने, पाचशे उमेदवार रिंगणात उतरविण्याचा विचार मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. जरांगे-पाटील यांच्या नव्या रणनीतीनुसार, पाचशे उमेदवार उभे न करता समाजातील एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करायचा. त्याच्या पाठीशी संपूर्ण समाजाने उभे राहून त्याला निवडून आणावे, जेणेकरून मराठा आरक्षणासाठी तो उमेदवार संसदेत आवाज उठविणार. Lok Sabha Election 2024

दरम्यान, याविषयी सविस्तर योजना आखण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २४ मार्च रोजी आंतरवली सराटी येथे बैठकीचे आयोजन केले असून, या बैठकीसाठी राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी नव्या रणनीतीवर चर्चा करण्याबरोबरच नऊशे एकरांतील सभेचेही नियोजन केले जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्र लिहून घेणार (Lok Sabha Election 2024)

पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे केल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा राजकीय पक्षांनाच होणार आहे. त्यामुळे पाचशेऐवजी समाजातील एकच उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी सबंध समाज त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. यावेळी उमेदवारी देताना संबंधित उमेदवाराकडून मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी संसदेत आक्रमकपणे आवाज उठविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार उभे करण्याबाबतची नवी रणनीती आहे. या उमेदवाराच्या पाठीशी समाजाची संपूर्ण ताकद उभी केली जाईल. यावर अंतिम निर्णय २४ मार्च रोजीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. – करण गायकर, राज्य समन्वयक, सकल मराठा समाज

राखीव मतदारसंघात सकल मराठा समाज पुरस्कृत उमेदवार उभे केले जाणार आहेत. या सर्व नियोजनाविषयी आंतरवली सराटी येथे बैठक होणार असून, त्यात संपूर्ण नियोजन केले जाणार आहे. या बैठकीत जरांगे-पाटील जो निर्णय घेतील, त्यास समाजाचा पाठिंबा असेल.

– नाना बच्छाव, आंदोलनकर्ते

हेही वाचा :

The post मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय? appeared first on पुढारी.