मालेगावी चार वर्षांत लाखो भुकेल्यांनी दिला तृप्तीचा ढेकर

Shiv Bhojan Thali Yojana pudhari.news

नाशिक (मालेगाव) : नीलेश शिंपी
गोरगरीब व भुकेल्यांना पोटभर जेवण मिळावे, या उदात्त हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून दि. 26 जानेवारी 2020 रोजी राज्यभरात शिवभोजन थाळी योजना (Shiv Bhojan Thali Yojana) राबविण्यास प्रारंभ झाला. भुकेल्यांना केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण मिळावे, या उद्देशानेच तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरू केलेल्या या योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील पाच शिवभोजन केंद्रांमध्ये गेल्या चार वर्षांत सुमारे 12 लाखांहून अधिक लोकांनी 10 रुपयांत पोटभर जेवण करून तृप्तीचा ढेकर दिला असे म्हटले, तर अनाठायी ठरणार नाही. (Shiv Bhojan Thali Yojana)

दाभाडी येथील साईश्रद्धा महिला बचतगटाचे केंद्र हे मोसमपूल येथील महिला बाल रुग्णालयाजवळ सुरू आहे. या बरोबरच बाजार समिती, कॅम्पातील सोमवार बाजार, सामान्य रुग्णालय व नवीन बसस्थानक आदी ठिकाणी ही केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांत दररोज साधारणत: 150 तर 200 थाळ्या शासनाकडून मंजूर आहेत. ही केंद्रे 11 ते 2 या वेळेत कार्यरत असतात. या केंद्रांमध्ये भुकेलेल्यांना केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण मिळत असल्याने या केंद्रांमध्ये कायमच गर्दी असते.

साईश्रद्धा महिला बचतगटाचे केंद्र हे शहरातच नव्हे, तर नाशिक जिल्ह्यात आगळेवेगळे केंद्र ठरले आहे. या केंद्रात दररोज शासनाने मंजूर केलेल्या 200 थाळ्यांव्यतिरिक्त 200 हून अधिक थाळ्या ह्या मोफत दिल्या जातात. गेल्या चार वर्षांत या केंद्रांत 2 लाख 88 हजार लाभार्थ्यांनी 10 रुपयांत, तर तेवढ्याच लोकांनी मोफत पोटभर जेवण करून तृप्तीचा ढेकर दिला आहे. या सर्व के्ंरद्रांत जेवणासाठी येणार्‍यांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवण्यात येत असून सर्व ठिकाणी जेवणाचा दर्जा उत्तम राखला जात आहे. थाळीत वरण, भात, भाजी, पोळी असे अन्न दिले जाते. रुग्णालयाजवळील केंद्रात एकूण 7 ते 8 कर्मचारी  यासाठी कार्यरत असून, हे केंद्र दररोज 11 ते 8.30 वाजेपर्यंत गोरगरिबांच्या सेवेत आहे. या केंद्राला दानशूर व्यक्तींची साथ मिळाल्याने खर्‍या अर्थाने मालेगावातील शिवभोजन थाळी केंद्र भुकेल्यांची भूक भागवीत आहे.  (Shiv Bhojan Thali Yojana)

दानशूर व्यक्तींची मदत
संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरावे असे दाभाडी येथील साईश्रद्धा महिला बचतगटाचे शिवभोजन थाळी केंद्र (Shiv Bhojan Thali Yojana) आहे. मालेगाव येथील शिवभोजन थाळी केंद्रावर पालकमंत्री दादा भुसे यांचे बारीक लक्ष आहे. या केंद्रात  जेवणासाठी आलेली व्यक्ती विनाजेवणाची परत जायला नको म्हणून भुसे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी अन्नदानासाठी दानशूर व्यक्तींची मदत घेतली आहे. येथील जय आनंद ग्रुप सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत त्या उपलब्ध होत आहे. भुसे यांच्या कार्यकल्पकतेमुळे या केंद्रात आजमितीस शासकीय दानशूर व्यक्तींच्या मदतीतून दररोज सुमारे 200 लाभार्थ्यांना 10 रुपयात, तर उर्वरित 200 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मोफत जेवण दिले जाते. येथील केंद्रावर पिंटू कर्नावट व हरिदादा निकम हे स्वतः कार्यरत असतात.

साईश्रद्धा महिला बचतगटाच्या केंद्रात महापुरुषांच्या जयंतीदिनी मिष्टान्नांचे मोफत वाटप केले जाते. गेल्या एक वर्षापासून खासगी रुग्णालयातील रुग्णांनादेखील या केंद्रातून मोफत डबा दिला जातो. त्याचप्रमाणे अनाथ व दिव्यांग व्यक्तींनाही येथे मोफत जेवण दिले जात
आहे. – हरिदादा निकम, संचालक.

हेही वाचा:

The post मालेगावी चार वर्षांत लाखो भुकेल्यांनी दिला तृप्तीचा ढेकर appeared first on पुढारी.