नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गोडसेंच्या उमेदवारीसाठी भक्कम पाठबळ उभे केल्याने अखेर महायुतीच्या जागावाटपात नाशिक शिंदे गटाने राखले. इतकेच नव्हे तर, श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीतून वेळ काढत मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारी (दि.२) नाशिक गाठल्याने शिंदे सेनेचा उत्साह वाढला आहे.
नाशिकच्या जागेसाठी महायुतीत मोठी चुरस होती. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र तथा युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर महायुतीत वाद निर्माण झाला होता. भाजपनेही या जागेवर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही नाशिकच्या उमेदवारीवर हक्क सांगण्यात आला होता. विशेषत: राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदर्भ देत नाशिकच्या उमेदवारीवर दावा केल्याने महायुतीत नाशिकच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी देखील गोडसे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. जोपर्यंत नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत कल्याण डोंबिवली मतदार संघातून पक्षाने आपली देखील उमेदवारी जाहीर करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. खासदार गोडसे यांनी स्वतः अनेकदा मुंबई वारी करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उमेदवारीच्या मागणीसाठी शक्तिप्रदर्शन केले होते. भाजप, राष्ट्रवादीकडून गोडसे यांच्या नावाला विरोध होत असल्याने शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव देखील उमेदवारीसाठी पुढे आले होते. यादरम्यान भाजपकडून दिनकर पाटील, आमदार अॅड. राहुल ढिकले, केदा आहेर, डॉ. राहुल आहेर, गणेश गिते आदींची नावे चर्चेत आली होती. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी महायुतीच्या उमेदवारीचा फैसला होत नसल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीसह समता परिषद आणि ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भाजपने शिंदे गटासमोर ठाणे हवे की नाशिक? असा प्रस्ताव मांडल्याने नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडला होता. उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेल्या संघर्षातून नाशिकचा विजय अडचणीचा बनल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे संकट मोचक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अचानक मंगळवारी नाशिकला धाव घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका घेत मंत्री भुजबळ यांचीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी (दि.१) मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
वाजेंचा वारू गोडसे रोखणार?
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर हेंमत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून हॅटट्रिक साधण्याची संधी मिळाली आहे. गोडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या सुमारे सव्वा महिना आधीच सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आली होती. वाजे यांनी मतदारसंघाचा दौरा करत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता वाजेंचा वारू गोडसे रोखणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: