मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

डॅमेज कंट्रोल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीत रंगलेला संघर्ष, त्यातून उद‌्भवलेली नाराजी आणि उमेदवारी घोषित करण्यासाठी झालेला विलंब यामुळे उमेदवाला पर्यायाने पक्षाला फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा करत ‘डॅमेज कंट्रोल’ केले. एकीकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराला बूस्ट देण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सुसंवादही साधला. शांतिगिरी महाराज निवडणूक रिंगणात कायम असल्याने हिंदुत्वावादी मतांची विभागणी टाळण्यासाठी साधु-महंत तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेत नाशिकसाठी त्यांनी फिल्डींगही लावली.

महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी महायुतीचा उमेदवार घोषित झाला. नाशिकच्या जागेवरून महायुतीत बराच काळ संघर्ष रंगला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीतील नाराजी कायम राहिली आहे. त्यातच स्वामी शांतीगिरी महाराज हे देखील नाशिकच्या निवडणूक रिंगणात कायम असल्याने त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या धावपळीत नाशिकचा दौरा करत शिवसेना(शिंदे गटा)च्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा मेळावा घेत त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे त्यांनी महायुतीतील राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गट, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं, कवाडे गट, प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एका हॉटेलमध्ये सुसंवाद साधत कामाला लागण्याच्या सूचना केल्या. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने लोकाभिमुख केलेली विकास कामे तसेच योजना लोकांपर्यंत पोहचविण्याबरोबरच महायुतीमध्ये समन्वय साधून काम करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी आपल्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची ओळखही करून घेतली.

राजकारणापेक्षा धार्मिक अधिष्ठान मोठे
स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या माघारीसाठी महायुतीकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. या पार्श्वभूमीवर साधु महंतांचे मन वळविण्यासाठी तसेच पाठींबा मिळविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जवळपास १३ आखाडयांचे साधू महंत तसेच वारकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. राजकीयपेक्षा धार्मिक अधिष्ठान महत्वाचे आणि मोठे असल्याचे सांगत स्वामी शांतीगिरी महाराजांचा आशिर्वाद आम्हाला नक्कीच मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी उपस्थित साधू महंत तसेच वारकऱ्यांनी महायुतीला पाठींबा देत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: