मोदींचा खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात

Sanjay Raut

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

त्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, राऊत म्हणाले महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही, लोक स्वताहून येतात. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. 20 मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा अशी थट्टा करत राऊतांनी टीका केली. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच, यावेळी नाशिकचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संजय राऊतांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला.

आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. मात्र, अर्ज भरण्याआधी संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

नरेंद्र मोदी व अमित शहा यांना भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. त्यांना मुंबईची लूट करुन मुंबईला पूर्णपणे कंगाल करायचे आहे. या त्यांच्या कारस्थानाच्या आड उद्धव ठाकरे व शरद पवार येत होते. प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते व पक्ष आहेत. म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकारे पाडली. दोन्ही पक्ष फोडले. अमित शहा व नरेंद्र मोदी यांना भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा कधीही मोह नव्हता. दहा वर्षात मोदी कायम खोटेच बोलत आले आहेत. त्यांचा खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनिज बुकात जाईल. अशी माझी भूमिका आहे. इतका खोटे बोलणारा नेता जनतेने आजवर पाहिला नाही. खोटे बोलण्याचा त्यांचा हा जो खेळ आहे त्याला ऑलिम्पिंक मध्ये समाविष्ट करता येईल का त्यासाठी भाजपचे एखादे पथक पाठवता येईल का ते पहावे लागेल. अशी टीका राऊत यांनी केली.

सगळे भ्रष्टाचारी मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचारविरोधात लढताय अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत. अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

हेही वाचा –