मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

राहुल गांधी चांदवड pudhari.news

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे माफ केला जाईल. यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार निवडून द्या, तुमचे मत वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिली.

चांदवडला काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत गुरुवारी (दि. १४) सकाळी ९.३० च्या सुमारास करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये शेतकरी सभा घेण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते.

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर बोट ठेवले. शेतकऱ्यांना जीएसटीच्या त्रासातून मुक्त करणार आहोत. कृषी अवजारे, खतांवरील जीएसटी हटविणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी सत्तेत आल्यानंतर केली जाणार आहे. अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत येथील शेतकरी देशासाठी अन्न उगवत आहे. या देशाच्या भूमिपुत्रासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, अशी ग्वाही देताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी अनेक गॅरंटी दिली परंतु शेतकऱ्यांसाठी एकही गॅरंटी पाळली नाही. आम्ही गॅरंटी नाही, तर वॉरंटी देत आहोत, असे सांगत शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार निवडून द्या, असे आवाहन केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी, शेतकऱ्यांनी कष्टाने, मेहनतीने पिकविलेला शेतमाल मोदी सरकारच्या काळात कवडीमोल दराने विक्री होतो. अन देशातील आमदार, खासदारांना ५० – ५० लाखांचे खोके दिले जातात. हेच का अच्छे दिन, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला. तर राष्ट्रवादीचे खासदार शरदचंद्र पवार यांनी, आज देशातील शेतकरी, मंजूर मोठ्या अडचणीत आहे. या अडचणीतून शेतकऱ्यांना काढले पाहिजे. मात्र केंद्राच्या सत्तेत बसलेल्यांपैकी एकालादेखील शेतकऱ्यांच्या समस्या कळत नसल्याची टीका पवार यांनी केली. फोडा आणि राज्य करा हेच धोरण सध्या अवलंबले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल आदींची भाषणे झाली.

खास मराठमोळा सत्कार

भारत जोडो यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी यांनी रामराम मंडळी म्हणत भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मराठमोळ्या पद्धतीने राहुल गांधी यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांना पगडी, उपरणे, बैलगाडी, विठ्ठलाची व संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली. तसेच काठी अन घोंगडे देऊन अनोखे स्वागत करण्यात आले. हा मराठमोळा सत्कार पाहून राहुल गांधी भावुक झाले होते.

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.