रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

छगन भुजबळ, जरांगे पाटील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीकडून नाशिक लाेकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडल्यास, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे सहा लाखांहून अधिक मतदान असून, ते विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यात जरांगे-पाटील यांनी नाशकात तळ ठोकल्यास, मतदारसंघातील राजकीय गणिते बदलण्याबरोबरच भुजबळ-जरांगे यांच्यातील द्वंद्व पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आतापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, ही सर्व नावे मागे पडत मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने, मराठा समाजात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद रंगला होता. मराठा आरक्षणावरून सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते तटस्थ भूमिकेत असताना, भुजबळांनी मात्र उघडपणे विरोध दर्शविला होता. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका भुजबळांनी मांडली होती. यावरून संपूर्ण मराठा समाज दुखावला असल्याचे चित्र त्यावेळी निर्माण झाले होते. मात्र, भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने, त्यांना जागोजागी मराठा समाजाचा विरोध सोसावा लागला. त्यांच्या येवला मतदारसंघातही मराठा समाजाने त्यांना विरोधाचे झेंडे दाखविले होते. यासर्व पार्श्वभूमीवर भुजबळ लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी, मराठा समाज आक्रमक झाला आहे.

महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांचे नाव निश्चित झाले असून, महायुतीकडून भुजबळ मैदानात उतरल्यास वाजे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगेल, असे तूर्त चित्र आहे. मात्र, मराठा समाजाने यात उडी घेतल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुजबळांच्या उमेदवारीकडे सबंध मराठा समाजाचे लक्ष लागून आहे.

मराठा समाजाचा उमेदवार कोण?
नाशिक लोकसभेच्या मैदानात मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार दिला जाणार असून, त्याबाबतचा निर्णय गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे आयोजित बैठकीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मराठा समाजाकडून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तसेच दिंडोरी मतदारसंघात पुरस्कृत उमेदवार म्हणून कोणाला उभे करायचे? हेदेखील निश्चित केले जाणार आहे.

मराठा समाजाची रणनीती अशी?
मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्यास, मराठा समाजासाठी नाशिक लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत भुजबळांविरुद्ध संपूर्ण समाजाला उभे करण्याचे मोठे आव्हान मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोर असणार आहे. कारण निवडणुकीचा कौल भुजबळांच्या बाजूने लागल्यास, मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत होण्याची शक्यता आहे. अशात जरांगे-पाटील मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. याठिकाणी त्यांच्या सभांचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.

The post रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा appeared first on पुढारी.