राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित

भुजबळ राज pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे महायुतीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले आहे. एकेकाळी जिल्ह्यात भुजबळ- राज ठाकरे वाद उफाळून आला होता. त्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी केली होती. मात्र, आता राजकारणाच्या या बदलत्या रंगाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात महापालिकेचे राजकारणही महत्त्वाचे ठरत असते. भाजपने मनसेला हाताशी घेत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. काही काळातच राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळ‌वणी करत महापालिकेवर झेंडा फडकवला होता. तेव्हा शहरात मनसे- भुजबळ वाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला होता. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी भुजबळांवर टीका केली होती. मफलर आवळण्याची भाषा करत टीकेची झोड उठवली होती. तेव्हापासून संवादाची दरी निर्माण झाली होती. स्थानिक राजकारणातही वेळोवेळी त्याची प्रचिती येत होती. मात्र, आता महायुतीमध्ये राज ठाकरेंची एन्ट्री होत असल्याने महायुतीला ते चांगलेच आहे. राज ठाकरे यांचे स्वागतच आहे. महापालिका, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची मदत होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांनी केले आहे.

नाशिकसाठी उमेदवार कोण?
महायुतीत नाशिकची जागा नक्की कुणाला मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावर चर्चा सुरू आहेत. जागा वाटप हळूहळू होत आहे. दि. 20 मे रोजी नाशिकची निवडणूक आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पाच टप्प्यांत निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी निवडणुकांसाठी खूप वेळ आहे. मोदी साहेबांना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

The post राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.