नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित केली जाण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, जवळपास सर्वच पक्षांचा नाशिकवर डोळा असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक दौरा करीत, निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त नाशिकमध्ये येत असून, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार शरद पवार तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे देखील मेळाव्यातून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
चालू महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष हे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधारी महायुतीने राष्ट्रीय युवा महोत्सव, विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी नाशिक दौरे केले. पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने राज्यस्तरीय अधिवेशनासाठी श्रीरामाची भूमी असलेल्या नाशिकची निवड केली. ठाकरे गटाचे सर्वच प्रमुख नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब श्रीकाळारामाची आरती केली. तसेच मेळावा घेत निवडणुकीचे नाशिकमधून रणशिंग फुंकले.
आता मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त गुरुवार (दि. ७) पासून तीनदिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. राज यांच्या दौऱ्यापाठोपाठ दि. १३ मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. निफाड तालुक्यातील उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केटमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त दि. १३ व १४ मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दि. १३ मार्चला ते मालेगाव येथे रोड शो तसेच कॉर्नर सभा घेऊन सौंदाणे येथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर दि. १४ मार्च रोजी चांदवड येथे शेतकरी परिषद घेऊन पिंपळगावमार्गे नाशिक शहरात ते रोड शो करणार आहेत. एकंदरीत पुढील सप्ताह हा राजकीय असून, नाशिककरांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करताना दिसून येणार आहे.
शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. पक्षाची ग्रामीण भागातील ताकद ओळखून निफाडच्या उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केट परिसरात आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. द्राक्ष, सोयाबीन, भाजीपाला व अन्य कृषिमालाला मिळत नसलेल्या भावावर ते बोट ठेवण्याची शक्यता आहे.
The post राजकीय सप्ताह : शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.